'राम मंदिरासाठी मोदींचे नव्हे उलट राजीव गांधींचे योगदान मोठे'

येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामी यांचे हे विधान भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

Updated: Aug 2, 2020, 02:28 PM IST
'राम मंदिरासाठी मोदींचे नव्हे उलट राजीव गांधींचे योगदान मोठे' title=

नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणात पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे तर राजीव गांधी यांचे योगदान मोठे आहे, असे वक्तव्य भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिरासंदर्भात भाष्य केले. यावेळी स्वामी यांनी म्हटले की, राम मंदिरासाठीचा सर्व युक्तिवाद आणि चर्चा आम्ही केल्या. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी परवानगी दिली. या निर्णयासाठी सध्याच्या सरकारने विशेष असे काही केलेच नाही, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले. 

राम मंदिरामुळे कोरोना आटोक्यात येणार आहे का? शरद पवारांचा मोदींना खोचक टोला

तसेच राम मंदिराचा अजेंडा पुढे रेटण्यात माजी पंतप्रधान राजीव गांधी, नरसिंह राव आणि विहिंपच्या अशोक सिंघल यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. उलट अटलबिहारी वाजपेयी यांनीदेखील राम मंदिराच्या कामामध्ये आडकाठी आणली होती. अशोक सिंघल यांनीच आपल्याला ही बाब सांगितल्याचा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता.

अयोध्या नगरी झळाळली

येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामी यांचे हे विधान भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कोरोनाचे संकट असताना भूमिपूजन सोहळा आयोजित केल्यामुळे विरोधकांकडून मोदी सरकारला लक्ष्य केले जात आहे. याशिवाय, राममंदिर आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांना भूमिपूजन सोहळ्यापासून दूर ठेवण्यात आल्यामुळे भाजपमध्येच कुजबुज सुरु आहे. अशातच आता सुब्रमण्यम स्वामी यांच्या या विधानामुळे मोदी सरकारविरोधातील वातावरण आणखीनच तापणार आहे.