PM Modi at ISRO post Chandrayaan 3 Landing on moon : इस्रोनं 14 जुलै 2023 रोजी अवकाशात पाठवलेल्या चांद्रयान 3 नं 23 ऑगस्ट 2023 ला चंद्र गाठला. चंद्राच्या दक्षिम ध्रुवावर चांद्रयानानं पाऊल ठेवलं आणि भारतानं इतिहास रचला. चंद्रावर यशस्वीरित्या यान उतरवणारा भारत चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला असून, ही सुवर्णाक्षरांमध्ये नोंद करून ठेवण्याजोगी कामगिरी आहे. याच कामगिरीची पोचपावती देण्यासाठी पंतप्रधानांनी ग्रीस दौऱ्यावरून परतताना दिल्लीऐवजी थेट इस्रोटं कार्यालय गाठलं. शनिवारी सकाळीच ते इस्रोमध्ये आले आणि एका क्षणात इथलं वातावरण बदललं.
इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांसह चांद्रयान मोहिमेसंदर्भातील सविस्तर माहिती आणि लँडरनं टीपलेली छायाचित्र पंतप्रधानांना दाखवली. ज्यानंतर इस्रो कार्यालयातून त्यांनी संपूर्ण देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या आणि कायमस्वरुपात लक्षात ठेवाव्यात अशा घोषणाही केल्या.
'ज्या ठिकाणी चांद्रयान 3 चं लँडिंग झालं ते ठिकाण इथून पुढं शिवशक्ती त्या नावानं ओळखलं जाणार आहे', असं पंतप्रधान म्हणाले. शिवामध्ये अर्थात शंकराच्या अस्तित्वामध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प सामावला आहे. तर, शक्तीमुळं आरपल्याला ते संकल्प पूर्ण करण्याचं सामर्थ्य मिळत आहे. चंद्राचा शिवशक्ती पॉईंट हिमालय ते कन्याकुमारी एकमेकाशी जोडले असण्याची बाब दर्शवत राहतील, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. ऋषीमुनींनी वदलेल्या श्लोकाचा उल्लेख करत त्यांनी यावेळी चांद्रयानाच्या च्या ठिकाणाचं अध्यात्मिक महत्त्वं सांगितलं.
'मनातील या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी शक्तीचा आशीर्वाद गरजेचा आहे. आणि ही शक्ती आपली नारीशक्ती आहे. आपल्या माता, भगिनी याच शक्तीचं प्रतीक आहेत', असं म्हणत पंतप्रधानांनी नारीशक्तीच्या योगदानाला नमन केलं. आपल्या इथं म्हणतात 'सृष्टी स्थिती विनाशाना, शक्ती भूते सनातनी' म्हणजेच निर्माणापासून प्रलयापर्यंत संपूर्म सृष्टीचा आधार नारीशक्तीच आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
'तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल चांद्रयान 3 मध्ये देशातील महिला वैज्ञानिकांनी, देशातील नारीशक्तीनं किती मोठी भूमिका निभावली आहे. चंद्राचा शिवशक्ती पॉईंट अनेक वर्षांपर्यंत संपूर्ण जगात याचीच साक्ष देईल. हा शिवशक्ती पॉईंट येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल की आपल्याला विज्ञानाचा वापर मानवतेच्या विकासासाठीच करायचा आहे. हे आपलं सर्वोच्च प्राधान्य आहे', या शब्दांवर त्यांनी जोर दिला.
पंतप्रधानांनी यावेळी चांद्रयान 2 मोहिमेचा उल्लेख करत त्या मोहिमेदरम्यान जिथं चंद्राचं पाऊल पडलं होतं त्या ठिकाणालाही नाव देत नवी ओळख दिली. इथून पुढं हे ठिकाण 'तिरंगा' म्हणून ओळखलं जाईल असं ते म्हणाले.
'आज हरघर तिरंगा आहे, प्रत्येकाच्या मनात तिरंगा आहे त्यामुळं तिरंग्याशिवाय दुसरं कोणतं नाव त्या ठिकाणाला दिलं जाईल? म्हणूनच चंद्राच्या ज्या ठिकाणावर चांद्रयान 2 नं आपलं पाऊल ठेवलं होतं त्या ठिकाणाला आला तिरंगा म्हणन संबोधलं जाईल. हा तिरंगा पॉईंट भारताच्या प्रत्येतक प्रयत्नासाठी प्रेरणा असेल, तो आपल्याला शिकवण देईल की कोणतंही अपयश शेवट नसतो. दृढनिश्चय असेल तर, यश मिळतंच' असं म्हणत पंतप्रधानांनी इस्रोच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.