PM Modi slams Nitish Kumar Over Assembly Remarks: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशमधील गुणा येथे निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य केलं आहे. लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात बोलताना विधानसभेमध्ये बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरुन मोदींनी संताप व्यक्त करताना नितीश कुमार यांना टोला लगावला.
इंडिया आघाडीचा उल्लेख करत मोदींनी नितीश कुमारांवर निशाणा साधला आहे. 'इंडी अलायन्स, अहंकार असलेल्या युतीमधील फार मोठा नेता विधानसभेमध्ये आया-बहिणींबद्दल अशा घाणेरड्या गोष्टी करत आहे ज्याचा विचारही करता येणार नाही. आया-बहिणींच्या अपमानाबद्दल या युतीमधील लोक एक शब्दही बोलायला तयार नाहीत. यांना लाज वाटली पाहिजे,' असं म्हणत मोदींनी 'इंडिया' आघाडीला लक्ष्य केलं.
'हे देशाचं किती दुर्दैव आहे. किती खाली पडणार तुम्ही. जगभरामध्ये देशाची लाज काढत आहात तुम्ही. जे लोक महिलांबद्दल असा विचार करतात ते तुमचं काय भलं करणार?' असा प्रश्न मोदींनी सभेला उपस्थित मतदारांना विचरला.
लोकसंख्या नियंत्रणासाठी महिलांच्या शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे यासंदर्भात बोलताना केलेलं वादग्रस्त विधान मागे घेताना नितीश कुमार यांनी माफी मागितली आहे. बुधवारी मी केलेल्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. बिहार विधानसभेच्या आवारामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना नितीश कुमार यांनी, "माझ्या विधानामुळे कोणाला काही त्रास झाला असेल तर मी माझं म्हणणं मागे घोतो. मी स्वत:च्या या विधानामुळे दु:खी आहे आणि त्यासाठी खेदज व्यक्त करतो. तुम्ही (विरोधी पक्षातील सदस्यांनी) मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे असं म्हटलं. मला केवळ लाज वाटत नसून मी केलेल्या विधानासाठी माफीही मागत आहे. मी ही सारी विधानं मागे घेत आहे," असं म्हटलं. आपण कायमच महिला सबलिकरणासाठी आवाज उठवत राहिलो आहोत, असंही नितीश कुमार सांगायला विसरले नाहीत.
विरोधी पक्षातील भाजपा सदस्यांनी सदनामधील अध्यक्षांच्या आसनासमोर येत गोंधळ घातला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी, 'तुम्हा लोकांना आदेश आला असेल की माझ्यावर टीका करा. मी माझे शब्द मागे घेत आहे. जे कोणी माझी निंदा करत आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो,' असं म्हटलं.
लोकसंख्या नियंत्रणासाठी महिलांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणं गरजेचा आहे असं म्हणताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी बिहारच्या विधानसभेत वादग्रस्त विधान केलं होतं. एक शिक्षित महिला आपल्या पतीला शरीरसंबंध ठेवत असताना थांबवू शकते, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यांनी यासाठी वापरलेल्या भाषेवरुन बराच वाद निर्माण झाला आहे.