PM Modi Parliament Budget Session: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 व्या लोकसभेच्या अखेरच्या सत्राला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कोरोना काळ, खासदारांची पगार कपात, नव्या संसदेचे निर्माण या सहित अनेक विषयांवर चर्चा केली. गेल्या 5 वर्षात देशाने सर्वात मोठं संकटं झेललं आहे. कोण जगेल?, कोण वाचेल? कोण कोणाला वाचवू शकतो की नाही, अशी अवस्था होती. पण देशाचे काम थांबू दिले नाही, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
देशाची गरज ओळखून त्यावेळी खासदार निधी देण्याचा प्रस्ताव ठेवला. समाजाला विश्वास देण्यासाठी खासदारांनी आपल्या पगारात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला, याची आठवण करत पंतप्रधानांनी खासदारांचे कौतुक केले.
खासदारांना खूप पगार मिळतो आणि कॅंटीनमध्ये स्वस्त जेवण मिळतं असं आम्हीदेखील ऐकायचो. पण लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांनी निर्णय घेतला आणि सर्वांसाठी कॅंटीनचे दर समान झाले. खासदारांनी कधीच या निर्णयाचा विरोध केला नाही, असे म्हणत पंतप्रधानांनी खासदारांचे कौतुक केले. नवे संसद भवन व्हावे याची चर्चा अनेकांनी केली पण निर्णय होत नव्हता. पण देशाने निर्णय घेतला आणि देशाला नवी संसद मिळाल्याचे पंतप्रधान म्हणाले.
मागची 5 वर्षे बदलाची ठरली. हे सर्व गेमचेंजर होते. 21 व्या दशकात भारत मजबूत स्थितीत दिसतोय. देश एका मोठ्या बदलाच्या दिशेने वेगाने प्रवास करतोय. लोकसभेतील सर्व सहकाऱ्यांनी यासाठी योगदान दिले आहे. आपल्या अनेक पिढ्या ज्या गोष्टींची वाट पाहत होत्या, ती कामे मागच्या 5 वर्षात झाली.
अनेक पिढ्यांनी एका संविधानाचे स्वप्न पाहिले होते. पण अनेकदा त्यात अडथळे आले. दरम्यान 370 कलम संपवले. संविधान ज्या महापुरुषांनी बनवले त्यांचा आत्मा जिथे कुठे असेल तिथून आम्हाला आशीर्वाद देईल, असे पंतप्रधान म्हणाले.
'जम्मू आणि काश्मीरमधील नागरिक सामाजिक न्यायापासून वंचित होते. सामाजिक न्यायाप्रती असलेल्या आमच्या वचनबद्धतेनुसार आम्ही जम्मू-काश्मीरमधील लोकांना सामाजिक न्याय मिळवून दिला. आज आम्हाला याचे समाधान असल्याचे ते म्हणाले.
'भारताला G20 चे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली. भारताला मोठा सन्मान मिळाला. देशातील प्रत्येक राज्याने भारताची क्षमता आणि तिची ओळख जगासमोर मांडली. त्याचा प्रभाव जगाच्या मानसावर अजूनही असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.