नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांच्या गाडीला बुधवारी अपघात झाला. राजस्थान येथील कोटा येथे आयोजित विवाह समारंभातून गुजरातला परतताना चित्तोडगड येथे ही घटना घडली.
अपघाताची घटना घडताच जशोदाबेन यांना उपचारासाठी रुग्णालयात तातडीने दाखल केले. दरम्यान, अपघाताचे कारण समजू शकले नाही. जशोदाबेन या मेहसाना जिल्ह्ल्यातील उंजा परिसरात आपले भाऊ अशोक यांच्यासोबत राहतात. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेताच त्यांना मेहसाना पोलिसांकडून सुरक्षा पुरविण्यात आली आहे. त्यांच्याभोवती सतत काही शस्त्रधारी पोलिसांचा कडक पहारा असतो. हे पहारेकरी दोन शिफ्टमध्ये काम करतात. त्यापैंकी पाली येथे पाच सुरक्षारक्षक असतात.
नोव्हेंबर २०१४ मध्ये आलेल्या एका रिपोर्टनुसार, जशोदाबेन यांनी आपली सुरक्षा स्थिती स्पष्ट करण्यास पोलिसांना सांगितले होते. विशेष असे की, जसोदाबेन यांनी माहिती अधिकाराचा (आरटीआय) वापर करत ही माहिती मागवली होती. आपण कोणत्या प्रकारच्या सुविधांचे हक्कदार आहोत... तसेच, आपल्याला कोणत्या सुविधा दिल्या जातात, याबाबत त्यांनी सरकारकडे विचारणा केली होती. जशोदाबेन या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत.
जशोदाबेन या मोदींसोबत राहत नाहीत. त्यांना सामाजिक कार्यात सहभागी होणे आवडते. सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले होते.