नवी दिल्ली : उद्योजकांच्या सीआयआय संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योजकांना संबोधित केलं. अर्थव्यवस्थेसंदर्भात पंतप्रधानांनी मार्गदर्शन करत उद्योजकांना केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वासही दिला आहे. देशाला आत्मनिर्भर करण्याचा संकल्प करुया, या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकद लावूया, सरकार तुमच्यासोबत आहे, तुम्ही देशाच्या लक्ष्यासह उभे राहा असं आवाहनही मोदींनी केलं आहे.
जगात भारतीय उद्योगाला मोठी संधी आहे. भारत कुणावरही अवलंबून नाही. लोकल इंडस्ट्री ग्लोबल करण्याची वेळ आहे. कोरोना संकटाच्या काळात जीवनासह अर्थव्यवस्थाही वाचवायची आहे. अर्थव्यवस्था मजबूत करणार, आयात कमी करण्याचे प्रयत्न सुरु करणार असून मेड इन इंडियावर भर देणार असल्याचंही मोदींनी सांगितलं. देशातील अनलॉकमुळे अर्थव्यवस्था रुळावर येण्यास मदत होईल असंही मोदी म्हणाले.
मला देशाच्या क्षमतेवर, बुद्धीमत्तेवर आणि तंत्रज्ञानावर विश्वास आहे, याच जोरावर भारताच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एका गती देण्यास मदत होणार असल्याचं मोदी म्हणाले. कोरोनाने आपली गती भले ही कमी केली असेल परंतु आता भारत लॉकडाऊनला मागे टाकत अनलॉक फेसमध्ये आला आहे.
अर्थव्यवस्था पुन्हा मजबूत करणं ही सरकारची प्राथमिकता आहे. या संकटाच्या काळातून बाहेर येण्यासाठी त्वरित निर्णयांशिवाय, अधिक काळपर्यंत फायदा देणारे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांबाबत ऐतिहासिक बदल करण्यात आले आहेत. आता शेतकरी आपल्या पिकाची, धान्याची कुठेही, आपल्या अटींवर विक्री करु शकतात. कोळसा सेक्टरला अनेक प्रकारच्या बंधनातून मुक्त केलं आहे. खाणकामांच्या अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे लोकांची मदत होईल. त्याशिवाय छोट्या उद्योगांना, लघु उद्योगांना कर्ज देण्यासाठी, रोजगार वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे निर्णय घेण्यात आले आहे.
पंतप्रधान गरीब योजनेअतंर्गत 74 कोटी लोकांना रेशन पोहचवण्यात आलं आहे. प्रवासी मजुरांही रेशन देण्यात येत आहे. आतापर्यंत गरीब कुटुंबांना 53 हजार कोटी रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. लॉकडाऊन काळात 8 कोटी गॅस मोफत देण्यात आले आहेत. प्रायव्हेट सेक्टरमधील 50 लाख कर्मचाऱ्यांना 24 टक्के EPFO सरकारकडून देण्यात आला.
देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी Intent, Inclusion, Investment, Infrastructure आणि Innovation या पाच गोष्टींवर विशेष भर देणं आवश्यक आहे. 'मेक इन इंडिया' आणि 'मेड फॉर वर्ल्ड' असे प्रोडक्ट बनवण्यावर भर देणं गरजेचं आहे.