मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना आवाहन केलंय. पंतप्रधानांनी आज रविवारी पद्म पुरस्कारासाठी नामांकने देण्याचे आवाहन केलंय. मोदींनी देशभरात विलक्षण कामगिरी करणाऱ्या लोकांची नावे सूचवावीत, अशी विनंती यासंबंधी ट्वीटद्वारे केली आहे. मोदींनी या पुरस्काराला ‘पीपल्स पद्म’असे नाव दिलंय. (pm Narendra Modi appealed to the people to suggest names for the Padma Award)
ट्वीटमध्ये काय म्हटलंय?
‘भारतात उल्लेखनीय कामगिरी करणारे अनेक प्रतिभावंत लोक आहेत. बर्याचदा, आपणाला त्यांच्याबाबत जास्त माहिती नसतं. त्यामुळे ते प्रसिद्धी आणि समाजापासून दूर असतात. तुम्हाला जर अशा प्रेरणादायक लोकांबाबत माहिती असेल, तर तुम्ही त्यांना पद्म पुरस्कारासाठी नामांकन देऊ शकता. नामांकनाची शेवटची तारीख 15 सप्टेंबर असणार आहे, असे ट्विट पंतप्रधानांनी केले.
India has many talented people, who are doing exceptional work at the grassroots. Often, we don’t see or hear much of them. Do you know such inspiring people? You can nominate them for the #PeoplesPadma. Nominations are open till 15th September. https://t.co/BpZG3xRsrZ
— Narendra Modi (@narendramodi) July 11, 2021
मोदींनी केलेल्या ट्वीटमध्ये नामांकनासाठी एक लिंक शेअर केली आहे. या पद्म पुरस्कारासाठी शिफारसी फक्त ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती, निवेदनातून दिली आहे. तसेच या पुरस्कारांसाठी सरकारने स्वतःचे नामनिर्देशित करण्याचीही तरतूद केली आहे.
देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि चमकदार कामगिरी करणाऱ्या असामन्य व्यक्तींना या पद्म पुरस्काराद्वारे सन्मानित केलं जातं. क्षेत्रानुसार, पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांची सुरुवात 1954 पासून करण्यात आली आहे.
पद्म पुरस्कारांच्या शिफारसी राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय मंत्रालये , उत्कृष्ट संस्था इत्यादींकडून प्राप्त केल्या जातात. या शिफारसींवर पुरस्कार समिती विचार करते. पुरस्कार समितीच्या शिफारसीच्या आधारे आणि पंतप्रधान, गृहमंत्री आणि राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर हे पुरस्कार जाहीर केले जातात.