close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

शीला दीक्षित यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान, राष्ट्रपती, सोनिया गांधी हजर

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही दाखल झाले

Updated: Jul 20, 2019, 11:24 PM IST
शीला दीक्षित यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान, राष्ट्रपती, सोनिया गांधी हजर

नवी दिल्ली : दिल्लीच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं शनिवारी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. आज दिल्लीतल्या एस्कॉर्ट रुग्णालयात वयाच्या ८१व्या वर्षी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. रविवारी दुपारी २.३० वाजता दिल्लीतल्या निगमबोध घाट इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सलग १५ वर्षांच्या दिल्ली मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात दीक्षित यांचा शहराच्या विकासामध्ये मोठा वाटा राहिला. त्यांच्या निधनाबद्दल सर्वपक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. 

शीला दीक्षित यांचं पार्थिव घरी आणल्यानंतर त्यांच्या घरासमोर अंत्य दर्शन घेणाऱ्यांची मोठी रांग लागलेली दिसतेय. कुटुंबीयांसमोबतच काँग्रेस पक्षाचे तसंच इतर पक्षांचे नेतेही इथं उपस्थित झालेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यादेखील शीला दीक्षित यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या. रविवारी दीक्षित यांचा पार्थिव देह काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यात येणार आहे. 

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही दाखल झाले. त्यांनी दीक्षित यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करत हात जोडले. 

यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे हेदेखील उपस्थित झाले.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही शीला दीक्षित यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित आणि त्यांच्या पत्नीला धीर दिला.