बंगळुरु: सुधारित नागरिकत्व विधेयकाविरोधात बंगळुरूतील आंदोलनात सहभागी झालेले इतिहासकार रामचंद्र गुहा यांना गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवणारे फलक दाखवत असताना पोलिसांनी त्यांना अक्षरश: खेचत ताब्यात घेतले. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी पोलिसांवर टीका केली आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आज देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरु आहे. मुंबईतही दुपारी चार वाजता ऑगस्ट क्रांती मैदानावर CAA विरोधात आंदोलन होणार आहे.
बंगळुरुतही अशाचप्रकारेच आंदोलन करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी तीन दिवसांसाठी शहरात जमावबंदी लागू केली होती. मात्र, तरीही अनेकजण CAA विरोधात रस्त्यावर उतरले होते. ही शक्यता लक्षात घेऊन अगोदरच शहरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. रामचंद्र गुहाही या आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र, पोलिसांनी आता त्यांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, दिल्लीतही CAA विरोधातील आंदोलन आणखी तीव्र झाले आहे. आज लाल किल्ल्याच्या परिसरात आंदोलन करणाऱ्या योगेंद्र यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर दिल्लीच्या मंडी हाऊस परिसरातून डी.राजा, सीताराम येचुरी, नीलोत्पल बासू, वृंदा करात या नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
#WATCH Karnataka: Police detained historian Ramachandra Guha during protest at Town Hall in Bengaluru, earlier today. #CitizenshipAct https://t.co/8jrDjtsOfm pic.twitter.com/P8csG0x9HN
— ANI (@ANI) December 19, 2019
तर तेलंगणामध्ये आंदोलन करणाऱ्या हैदराबाद विद्यापीठाच्या ४० विद्यार्थ्यांनी पोलिसांनी अटक केली. ही एकूणच परिस्थिती पाहता मुंबईतही पोलिसांकडून आंदोलनातील प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या मोर्चात फरहान अख्तर, जावेद अख्तर, शबाना आझमी, अनुराग कश्यप, स्वरा भास्कर, कुणाल कामरा, अनुभव सिन्हा ही मंडळीही सहभागी होणार आहेत. याशिवाय मुंबईतल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणात विद्यार्थीही सहभागी होणार आहेत.