Tirupati Laddu Controversy : तिरुमला तिरुपती देवस्थानकडून प्रसाद स्वरुपात दिल्या जाणाऱ्या लाडूसाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीसंदर्भात आक्षेप घेतला गेला आणि एका नव्या वादानं डोकं वर काढलं. या वादाला राजकीय किनार मिळत असतानाच उत्तर प्रदेशातील मैनपुरीच्या खासदार डिंपल यादव यांनी मथुरेतील खव्याचीही तपासणी झालीच पाहिजे अशी मागणी केली.
सपा नेत्यांकडून या प्रकरणीच्या भेसळीसंदर्भातील प्रकरणं अतिशय गंभीर स्वरुपातील असल्याचं सांगत मथुरेतील खव्यामध्ये भेसळ असल्याची वृत्त समोर येत असल्यामुळं तिथंही तपासणी झालीच पाहिले अशी भूमिका मांडली. 'जन जागरण संविधान बचाओ सायकल यात्रा'दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा मुद्दा प्रकाशात आणला.
तिरुपती लाडूमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर होत असल्याचं पाहून ही अशी प्रकरणं अतिशय गंभीर असल्याची बाब त्यांनी समोर आणली. सदर प्रकरणांमुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचं म्हणत सरकारकडून याची तपासणी होऊन दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. इतकंच नव्हे तर आता मथुरेमध्येही खव्यात भेसळ असल्याची प्रकरणं समोर येऊ लागल्यामुळं भाजप सरकारनं या दोन्ही प्रकरणांमध्ये लक्ष घालत तपासणी केलीच पाहिजे, असा सूर त्यांनी आळवला.
दरम्यान डिंपल यादव यांच्या या मागणीनंतर उत्तर प्रदेशात एफएसडीएच्या वतीनं मथुरेत असणाऱ्या प्रमुख 13 मंदिरांतील प्रसादाचे नमुने एकत्र केले असून, ते चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान खाद्य विभागाच्या वाट्याला आलेल्या अपयशामुळं आणि त्यांच्या अकार्यक्षमतेमुळं पदार्थांमधील भेसळ आणि त्यानंतर फोफावणारे आजार अशी परिस्थिती ओढावत असून जबाबदार विभागानं मात्र यावर मौन पत्करलं आहे अशा शब्दांत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
FSSAI च्या वतीनं देशभरात गाजलेल्या या प्रकरणावर कटाक्ष टाकत तिरुमला तिरुपती देवस्थानला कथित स्वरुपात निम्न दर्जाच्या तुपाचा पुरवठा केल्याप्रकरणी तामिळनाडूतील एका कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 'ए आर डेरी फूड प्राइवेट लिमिटेड'ला थेट सवाल करत खाद्य सुरक्षा आणि मानक विनिमयन 2011 मधील तरतुदींचं उल्लंघन केल्याप्रकरणी परवाना रद्द का करु नये? असं विचारलं आहे. दरम्यान सदर प्रकरणी पुढील तपास आणि कारवाईवर सर्वांचं लक्ष राहील असंच स्पष्ट होत आहे.