मुंबई : आपल्या घरी येणारा पोस्टमन नव्या अवतारात दिसला तर आश्चर्य वाटू देऊ नका. कारण खाकी रंगात घरी पत्र घेऊन येणारा पोस्टमन आता स्मार्टमन झालेला पाहायला मिळणार आहे. पोस्टमनला आता कॉर्पोरेट लूक मिळण्याची तयारी सध्या सुरू आहे.
पोस्ट विभाग सध्या झपाट्याने बदल करीत आहे. नव्या युगाशी स्पर्धा करताना पोस्टमन नव्या रुपात दिसणार आहेत. तसेच पोस्टमनच्या हाती स्मार्टफोन आणि आयपॅडही देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक घरी जाऊन देवाण-घेवाण करण्याच्या त्रासातून त्याची मुक्तता होणार आहे. पोस्टमन आता पत्रांसोबत एटीएम आणि ई शॉपिंग डिलीव्हरीही करणार आहेत.
२०१८ अखेरपर्यंत सर्व ३ लाख कर्मचारी पो्स्ट पेमेंट बॅंकेची सेवा देणार आहेत. तसेच २०१८ पर्यंत पोस्ट बॅंक ही देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात असणार असल्याचे इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक (आयपीपीबी) चे सीईओ ए.पी. सिंह यांनी सांगितले.
डिजीटल इंडिया मोहीमेत पोस्ट विभागही अग्रेसर होणार आहे. कारण आता ग्राहकांची डिजीटल सिग्नेचर घेण्यात येणार आहे. नवीन प्रणाली अंतर्गत, पोस्टमन स्मार्ट फोनवर थेट रेजिस्ट्री किंवा स्पीड पोस्ट, मनी ऑर्डरची पावती मिळविण्यासाठी डिजिटल स्वाक्षरी घेणार आहेत.