नवी दिल्ली : 'मी पंतप्रधान बनलो त्यावेळी प्रणव मुखर्जी नाराज झाले होते' असा गौप्यस्फोट केलाय खुद्द माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी...
'सोनिया गांधी यांनी मला पंतप्रधान पदासाठी निवडलं होतं. प्रणव मुखर्जी या पदासाठी माझ्यापेक्षा उत्तम होते... परंतु, त्यांनाही माहीत होतं की मी यामध्ये काहीही करू शकत नव्हतो. माझ्याकडे पद स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता' असं यावेळी मनमोहन सिंग यांनी म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, यावेळी सोनिया गांधीदेखील उपस्थित होत्या. पंतप्रधानांचं हे वाक्य ऐकून त्या हलकेच हसतही होत्या.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं नवं पुस्तक 'द कोएलिशन इअर्स 1996-2012'चं प्रकाशन करण्यात आलं... याचवेळी माजी पंतप्रधान बोलत होते.
#WATCH: Manmohan Singh says Pranab Mukherjee had every reason to feel a grievance that he was better qualified than I was, to become PM pic.twitter.com/8vMy4bBogL
— ANI (@ANI) October 13, 2017
पंतप्रधानपदावर अनपेक्षितरित्या निवड झाल्याच्या दिवसांची आठवण करत मनमोहन सिंग यांनी 'प्रणव मुखर्जी राजकारणात माझ्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत वरिष्ठ होते. तरीही पंतप्रधान पदावर माझी निवड झाली. यानंतरही आमच्या नात्यात कधीही अंतर आलं नाही' असंही त्यांनी म्हटलं.
यावेळी, सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी, सीपीएम नेते सीताराम येचुरी, सीपआयचे सुधाकर रेड्डी आणि डी राजा, एसपी अध्यक्ष अखिलेश यादव हेदेखील उपस्थित होते.