काही जणांसाठी कुटुंब म्हणजेच पक्ष, मोदींची टीका

प्रियांका गांधी यांना काँग्रेसकडून नवी जबाबदारी देण्यात आल्यावर, टीका करत मोदी म्हणाले.... 

Updated: Jan 24, 2019, 09:02 AM IST
काही जणांसाठी कुटुंब म्हणजेच पक्ष, मोदींची टीका  title=

मुंबई : लोकसभा निवडणूका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं देशातील राजकीय पटलावर होणाऱ्या हालचाली अनेकांचच लक्ष वेधत आहेत. नुकतंच प्रियांका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली, ज्यामुळे राजकीय विश्वात पुन्हा एकदा पक्ष मजबुत करण्याकडेच अनेकांचा कल असल्याचं स्पष्ट झालं. काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेल्या या महत्त्वाच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

'मेरा बूथ सबसे मजबूत' या उपक्रमाअंतर्गत बारामती, गडचिरोली, हिंगोली, नांदेड आणि नंदुरबार या भागातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी आपलं मत मांडलं. 'आमच्या पक्षात कोणताच निर्णय हा कुटुंबाला किंवा अमुक एका व्यक्तीला काय वाटतं यावरुन घेण्यात येत नाही', असं विधान त्यांनी केलं. देशात अनेक गोष्टींमध्ये कुटुंबतच पक्ष आहे, असं म्हटलं जातं पण भाजप मध्ये मात्र पक्षच कुटुंब आहे, अशी थेट प्रतिक्रिया देत त्यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीच्या राजकारणावर टीका केली. सोबतच सकारात्मक उपक्रम आणि योजनांना कधीच काँग्रेसकडून दुजोरा मिळाला नसल्याचा मुद्दाही त्यांनी यावेळी मांडला.

काँग्रेसच्या संस्कृतीलाच आपला विरोध असल्याचं म्हणत काँग्रेसमुक्त देशाचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. भाजपचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये प्रियांका गांधी यांना अतिशय महत्त्वाचं पद देण्यात आलं असून, आता यापुढे त्या खऱ्या अर्थाने राजकारणात सक्रिय झालेल्या दिसणार आहेत. लोकसभा निवडणूकांपूर्वीच ऐन रंगात आलेल्या राजकीय वातावरणात त्यांच्याकडे हा पदभार सोपवण्यात आला असून, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्या कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे येत्या काळात राजकारणामध्ये बऱ्याच लक्षवेधी हालटाली पाहायला मिळणार आहेत हे नक्की.