PUBG गेम खेळताना झालं प्रेम, प्रियकराच्या भेटीसाठी पाकिस्तानी महिला 4 मुलांसह सीमा ओलांडून भारतात

PUBG Game Love Story: महिला आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातून अवैधरित्या येत असल्याची माहिती गौतमबुद्ध नगर आयुक्तालय पोलिसांना मिळाली. शुक्रवारी संध्याकाळपासून उच्च अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून आयुक्तालय पोलिसांचे पथक या प्रकरणाच्या टोकापर्यंत जाण्यासाठी महिला आणि तरुणाचा शोध घेण्याच्या कामात व्यस्त आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jul 3, 2023, 01:27 PM IST
PUBG गेम खेळताना झालं प्रेम, प्रियकराच्या भेटीसाठी पाकिस्तानी महिला 4 मुलांसह सीमा ओलांडून भारतात title=

PUBG Game Love Story: पब्जी गेम वारंवार खेळल्याने डोक्यावर परिणाम झालेले अनेक तरुण आपण पाहिले आहेत. दरम्यान पब्जी खेळताना गेम पार्टनरसोबतच प्रेम झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील तरुणी पाकिस्तानी तर तरुण हा भारतीय आहे. त्यांनी प्रेमात एकत्र राहण्याच्या इतक्या आणाभाक घेतल्या की भारत-पाकिस्तानची सीमा देखील तिने पार केली. या तरुणीचे नाव सीमा असून यातील तरुणाचे नाव सचिन असे आहे. 

सीमा आणि सचिन हे एकमेकांचे पब्जी गेममधील पार्टनर होते. गेम खेळता खेळता कधी प्रेम झालं हे त्यांना कळालं नाही. आता दोघांच्यामध्ये देशाची सीमा असल्याने भेट अशक्य होती. पण प्रेम आंधळ असतं असं म्हणतात. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. आपल्या गेम पार्टनलला लाईफ पार्टनर बनवण्यासाठी पाकिस्तानच्या सीमा (27) ने दोन देशांची सीमा ओलांडली. एवढंच नव्हे तर येताना ती आपल्या चार मुलांना घेऊन रबुपुरा शहरात पोहोचली. 

सीमा नेपाळमार्गे महिनाभरापूर्वी भारतात पोहोचली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्रीपर्यंत राबुपुरा येथील सचिनसोबत राहिली. भारतात राहण्यासाठी लागणारे कोणतेही वैध कागदपत्रे सीमाकडे नव्हते. होते ते फक्त सचिनवरचे प्रेम. भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी सीमा सचिनसोबत लग्न करण्याच्या तयारीत होती, असे सांगण्यात येत आहे. 

गौतमबुद्ध नगर आयुक्तालय पोलिसांना या प्रेम कहाणीची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीमा आणि सचिन यांना हे कळताच ते चार मुलांना घेऊन टॅक्सीतून जेवरच्या दिशेने पळून गेले. आता पोलीस टॅक्सी चालक आणि आजूबाजूच्या लोकांची चौकशी करून पोलीस महिलेचा शोध घेत आहेत. 

दुसरीकडे, हे खरं प्रेम प्रकरण आहे की PUBG वर मैत्रीच्या बहाण्याने पाकिस्तानमधून काही खोल षडयंत्र रचले जात आहे का हे देखील शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

रबुपुरा येथील आंबेडकर नगर येथे राहणारा सचिन (२२) याची काही महिन्यांपूर्वी PUBG गेम खेळताना पाकिस्तान सीमेपलीकडील सीमासोबत ओळख झाली. गेम खेळत असताना दोघांनी एकमेकांचा मोबाईल नंबर घेतला आणि बोलायला सुरुवात केली. काही दिवसांनी दोघेही घट्ट मित्र बनले, अशी माहिती एका वकिलाने दिली.

मी सिंध प्रांतातील कराची येथील रहिवासी असून चार मुलांची आई आहे, असे सीमाने सचिनला सांगितले. फोनवर बोलणे आणि व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून दोघे इतके जवळ आले की दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्याचेही वकिलांनी पुढे सांगितले. 

यानंतर सीमाने कसा तरी नेपाळचा व्हिसा मिळवला आणि नंतर नेपाळ सीमेवरून भारतात प्रवेश केला. यानंतर आता ती रबुपुरा येथील तरुणासोबत आहे. हे दोघेही तरुण-तरुणी लग्नासाठी प्रयत्नशील आहेत. आयुष्याचा साथीदार होण्यासाठी कायदेशीर माहिती गोळा करत होते. 

दरम्यान, ही महिला आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातून अवैधरित्या येत असल्याची माहिती गौतमबुद्ध नगर आयुक्तालय पोलिसांना मिळाली. शुक्रवारी संध्याकाळपासून उच्च अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून आयुक्तालय पोलिसांचे पथक या प्रकरणाच्या टोकापर्यंत जाण्यासाठी महिला आणि तरुणाचा शोध घेण्याच्या कामात व्यस्त आहे.

सीमावर हेरगिरीचा संशय

महिलेचा भाऊ पाकिस्तानी लष्करात तैनात आहे. तिचा नवरा चार दिवसांपासून तिच्यापासून दूर राहतोय. तर चार मुलं तिने सोबत आणली आहेत. त्यांचे वय तीन ते आठ वर्षांदरम्यान आहे.दुसरीकडे सीमा अनेक दिवसांपासून दिल्लीला जाण्याचा आग्रह करत होती म्हणून तरुणाला लग्नाची औपचारिकता लवकरात लवकर पूर्ण करायची आहे. अशा गोष्टींमुळे सीमा गुप्तहेर असल्याचा संशय 
आला. 

नेपाळचा व्हिसाची मुदत संपली, सुरक्षेवर पुन्हा प्रश्न उपस्थित

सीमाकडे पाकिस्तानचा पासपोर्ट आणि नेपाळचा व्हिसा आहे पण त्याची मुदत संपली आहे. पण महिलेकडे भारतात राहण्याचा कोणताही वैध पुरावा नाही. अशा स्थितीत गौतम बुद्ध नगरमध्ये परप्रांतीयांच्या अवैध वास्तव्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. यावेळी हे प्रकरण पाकिस्तानशी संबंधित असल्याने पोलीस हे प्रकरण गांभीर्याने घेत आहेत. मात्र ही महिला अनेक दिवस बेकायदेशीरपणे वास्तव्यास असूनही पोलिस आणि एलआययूला त्याची माहिती नव्हती.

ही महिला राबुपुरा परिसरात आल्याची माहिती पाकिस्तानातून मिळाली आहे. पोलीस पथक या महिलेचा कसून शोध घेत आहे. महिलेची चौकशी करून तिची कागदपत्रे तपासल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिस आयुक्त गौतम बुद्ध नगर  लक्ष्मी सिंह यांनी दिली आहे.