पुलवामा हल्ल्यानंतर RSS संबंधित संघटनेची पंतप्रधानांकडे मोठी मागणी

स्वदेशी जागरण मंचाचे सहनिमंत्रक अश्वनी महाजन यांनी हे पत्र नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.

Updated: Feb 19, 2019, 09:12 AM IST
पुलवामा हल्ल्यानंतर RSS संबंधित संघटनेची पंतप्रधानांकडे मोठी मागणी title=

नवी दिल्ली - दहशतवादी संघटना 'जैश ए मोहम्मद'ने पुलवामातील अवंतीपोराजवळ केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर केलेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर चीनच्या कंपन्यांना भारतात व्यवसाय करू देऊ नका, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित स्वदेशी जागरण मंचाने केली आहे. अशी विनंती करणारे पत्रच स्वदेशी जागरण मंचाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. एएनआय वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास चीनचा पाठिंबा नाही. या मार्गात कायम अडथळे उभे करण्याचे काम चीनकडून केले जात आहे. त्यासाठीच चीनच्या कंपन्यांवर देशात बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

स्वदेशी जागरण मंचाचे सहनिमंत्रक अश्वनी महाजन यांनी हे पत्र नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. पत्रामध्ये लिहिण्यात आले आहे, की पुलवामातील हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात दहशतवाद्यांविरोधात संताप आहे. अशा वेळी जे देश दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहेत. त्याच्या आर्थिक नाड्या आवळणे आवश्यक आहे. दहशतवाद्यांना पद्धतशीरपणे पाठिंबा देणाऱ्या देशांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताकडून जे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामध्ये खो घालण्याचे काम चीन सरकारकडून करण्यात येत आहे, हे आता जगजाहीर आहे. त्यामुळे अशा स्थितीत भारतातून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी आलेल्या कंपन्यांमध्ये विविध अडथळे तयार करून चीनला धडा शिकवला पाहिजे, अशा स्वरुपाचा आशय पत्रामध्ये लिहिण्यात आला आहे. 

पाकिस्तानला देण्यात आलेल्या मोस्ट फेवर्ड राष्ट्राचा दर्जा तातडीने काढून घेण्याच्या आणि पाकिस्तानातून आयात केलेल्या वस्तूंवरील सीमाशुल्क मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचेही स्वदेशी जागरण मंचाने स्वागत केले. भारतीय नागरिकांची सविस्तर माहिती (डेटा) चीनला उपलब्ध करून देऊ नये. त्यावर विविध निर्बंध लादण्यात यावेत, अशीही मागणी मंचाने केली आहे.