Punjab च्या मतदारांचा दिल्ली मॉडेलवर शिक्कामोर्तब, चन्नींना नाकारलं तर कॅप्टन ही आऊट

Punjab Result : पंजाबमध्ये सत्ता परिवर्तन होताना दिसत आहे. आम आदमी पक्षाची लाट पंजाबमध्ये दिसून येत आहे. ज्यामध्ये अनेक दिग्गज नेते पराभवाच्या छायेत आहेत. काँग्रेसला येथे मोठा झटका बसला आहे.

Updated: Mar 10, 2022, 12:23 PM IST
Punjab च्या मतदारांचा दिल्ली मॉडेलवर शिक्कामोर्तब, चन्नींना नाकारलं तर कॅप्टन ही आऊट title=

Punjab Election Result : दिल्लीची सीमा ओलांडून आम आदमी पक्षाने (AAP) पंजाबमध्येही आपला झेंडा फडकवला आहे. राज्यातील मतदारांनी केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या दिल्ली मॉडेलवर (Delhi Model) शिक्कामोर्तब केले आहे. 'आप' पंजाबमध्ये केवळ सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला नाही, तर बहुमताच्या आकड्यापेक्षाही खूप पुढे असल्याचे दिसतेय. त्यामुळे आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Mann) पंजाबचे नवे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. (Bhagwant Mann become next Cm of Punjab)

विशेष म्हणजे काँग्रेस (Congress) आणि अकाली दल (Akali Dal) यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी लढत आहे, पण दोन्ही मिळून 'आप'चा एक चतुर्थांशही आकडा गाठताना दिसत नाहीत. त्याचवेळी भाजपलाही (BJP) दुहेरी आकडा गाठण्याची आस लागली आहे. सध्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाही कोणताही चमत्कार दाखवता आलेला नाही.

पक्षातील अंतर्गत वादाचा फटका काँग्रेसला बसताना दिसत आहे. नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित न केल्याने ते देखील कुठेतरी नाराज होते. पण पंजाबच्या जनतेने नव्या पर्यायाला मतदान केलंय.

नेत्यांची घरे पाहूनही निवडणुकीतील पराभव आणि विजयाचा अंदाज लावता येतो. पंजाबचे होणारे नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांचं घर फुलांनी सजवण्यात आले आहे. सकाळपासून त्यांच्या घरीही जिलेबी बनवली जात होती. दुसरीकडे, विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत चन्नी आणि अकाली नेते सुखबीर सिंह बादल यांच्या घरी शांतता आहे.