Punjab Crime : पंजाबच्या अमृतसरमधून (Amritsar) एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका निर्दयी बापाने मुलीची हत्या केली आहे. आरोपी बाप एवढ्यावरच थांबला नाही. मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह बाईकला (motorcycle) बांधत फरफटत नेला आहे. अमृतसरमध्ये आरोपी बापाने 16 वर्षीय मुलीची चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह बाईकला बांधून गावभर फिरवला. त्यानंतर आरोपीने मृतदेह रेल्वे रुळावर फेकून दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Punjab Police) मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. तर आरोपी बाप फरार आहेत.
अमृतसरच्या टांगराच्या मुच्छल गावात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणी दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता होती. बऱ्याच ठिकाणी शोध घेऊनही मुलगी सापडली नाही. मात्र गुरुवारी अचानक ती घरी परतली. त्यामुळे संतापलेल्या बापाने घराबाहेरच मुलीची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या केली. सगळ्या गावकऱ्यांनी हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला. यानंतरही वडिलांचा राग शांत न झाल्याने त्याने मुलीचा मृतदेह ओढणीने बाईकच्या पाठीमागे बांधून 350 मीटरपर्यंत ओढत नेत रेल्वे फाटकाजवळ फेकून दिला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
दलबीर सिंग उर्फ बाऊ यांची 20 वर्षीय मुलगी बुधवारी घरी काहीच न सांगता घरातून निघून गेली होती. कुटुंबीयांनी मुलीचा खूप शोध घेतला पण ती कुठेच सापडली नाही. त्यानंतर गुरुवारी दुपारी अचानक ती परतली. तिला पाहताच तिचे वडील दलबीर सिंग संतापले. त्यानंतर दलबीर सिंगने मुलीला घराबाहेर आणत तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. जोपर्यंत मुलीचा मृत्यू होत नाही तोपर्यंत दलबीर तिच्यावर वार करतच होता.
यानंतरही आरोपी दलबीर सिंगचे समाधान झाले नाही. त्याने मुलीचे दोन्ही पाय तिच्या ओढणीने बाईकच्या मागे बांधले. यानंतर तिला गावातून 350 मीटर अंतरावर रेल्वे फाटकाजवळ फेकून दिला. त्यानंतर आरोपी दलबीर सिंग तिथून फरार झाला. ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.
आरोपी दलबीर सिंहने कुटुंबातील इतर सदस्यांना धमकावले होते की जो कोणी मुलीला वाचवण्यासाठी येईल तो त्यालाही मारून टाकेल. दलबीरने मुलीचा मृतदेह बाईकच्या पाठीमागे बांधून रेल्वे रुळांजवळ नेला होता. मात्र याबाबत पोलिसांना आधीच माहिती मिळाली होती. मृतदेहावरुन ट्रेन पुढे जावी आणि ही संपूर्ण घटना अपघात असल्याचे भासवण्याचा आरोपीचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.