नवी दिल्ली : देशभरातील भाजप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. मला त्यांची भीती वाटत नाही. मला आता तो माझा सन्मान वाटतो असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. १५-१६ खटले सध्या सुरु आहेत. जेव्हा तुम्ही सैनिकांना पाहता तेव्हा त्यांच्याकडची खूप सारी पदकं त्यांचा सन्मान आणखी वाढवतात. त्याप्रमाणे हा प्रत्येक खटला माझ्यासाठी पदकंच असल्याचे ते म्हणाले. युनायटेड डेमोक्रेटीक फ्रंटच्या कार्यक्रमात काँग्रेसच्या नेतृत्वाला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले.
खटल्यांची संख्या जितकी अधिक तितका मी आनंदीत होईन असेही राहुल गांधी म्हणाले. मी त्यांच्याशी वैचारीक लढाई लढत आहे. द्वेशाने भरलेल्या भारतावर माझा विश्वास नाही. भाजपने मला किती ही मनवायचा प्रयत्न केला तरी मला फरक पडत नसल्याचे ते म्हणाले. महिला, सर्व धर्म, समुदाय आणि विविध विचारधारेच्या सन्मानामध्ये देशाची खरी ताकद आहे.
जेव्हा माझ्याविरुद्ध खटला भरला जाईल मी प्रेमाचे वर्तन ठेवेन. तुम्ही माझ्यासोबत उभे आहात हे मी कधी विसरणार नाही. ते केव्हाही माझ्याविरोधात तक्रार दाखल करतील तर ते माझ्यासाठी पदकं असेल असे राहुल गांधी म्हणाले.
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी हे पुन्हा एकदा अडचणीत येणार अशी चिन्हं दिसत आहेत. भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांचा दहशतवादी म्हणून उल्लेख करणे त्यांना महागात पडू शकते. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यासंदर्भातील लेखी तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. लोकसभा अध्यक्ष याप्रकरणी विशेषाधिकार समिती नियुक्त करु शकतात अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. विशेषाधिकारांच्या पायमल्लीचा (breach of privilege) ची तक्रार राहुल गांधी यांच्या विरोधात करण्यात आला आहे. नियुक्त केलेली समिती या निर्णयाचा विचार करुन पुढचा निर्णय घेईल. आवश्यकता वाटल्यास राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलवण्यात येईल असेही सांगण्यात येत आहे.