वायनाडमध्ये गांधी विरुद्ध गांधी; एकाच आडनावाच्या चार उमेदवारांमुळे संभ्रम

चौघांच्या नावातील साम्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो.

Updated: Apr 6, 2019, 03:40 PM IST
वायनाडमध्ये गांधी विरुद्ध गांधी; एकाच आडनावाच्या चार उमेदवारांमुळे संभ्रम title=

तिरुवनंतपुरम: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. राहुल पहिल्यांदाच अमेठी वगळता अन्य मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र, आणखी एका कारणामुळे वायनाड मतदारसंघाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मतदारसंघात चक्क राहुल गांधी नाव असणारे दोन आणि गांधी आडनावाचा एक उमेदवार रिंगणात आहे. या मतदारसंघात २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २३ एप्रिल हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे गांधी आडनावाचे हे उमेदवार माघार घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वगळता वायनाडमधून के ई राहुल गांधी, अगीला इंडिया मक्कल कझगम पार्टीचे सदस्य कोयंबतूरचे के के राहुल गांधी आणि त्रिसूरचे के एम शिवप्रसाद गांधी हे रिंगणात आहेत. चौघांच्या नावातील साम्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. याचा फटका काँग्रेस अध्यक्ष राहुल यांनी बसण्याची शक्यता आहे.

वायनाड हा मतदारसंघ तामिळनाडू, कर्नाटक व केरळच्या सीमेवर आहे. या तीन राज्यांतल्या मिळून ८७ मतदारसंघांमध्ये राहुल गांधींच्या उमेदवारीचा प्रभाव पडेल. त्यामुळेच दक्षिण भारतात काँग्रेसची हवा निर्माण करण्यासाठी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राहुल यांनी या मतदारसंघाची निवड केल्याची चर्चा आहे. २००८ मध्ये तयार झालेला हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो.