मला मत द्या; राहुल गांधींचे अमेठीतील मतदारांना जाहीर साकडे

यंदा अमेठीची लढत राहुल गांधी यांच्यासाठी कठीण मानली जात आहे.

Updated: May 3, 2019, 07:14 PM IST
मला मत द्या; राहुल गांधींचे अमेठीतील मतदारांना जाहीर साकडे title=

नवी दिल्ली: अमेठीतील जनता मला कुटुंबासारखी असल्याचे सांगत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी येथील मतदारांना साकडे घातले. राहुल यांनी अमेठीवासियांना खुले पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, अमेठी मतदारसंघ माझ्यासाठी कुटुंबासारखा आहे. अमेठीने मला सत्याच्या बाजूने उभे राहण्याची आणि दुर्बल घटकांचे दु:ख जाणून घ्यायची ताकद दिली. तुमच्यामुळेच मला सर्वांना न्याय देण्यासाठी शपथ घेण्याचे धैर्य मिळाले. आता केंद्रात लोकाभिमुख सरकार स्थापन करण्यासाठी मला तुम्हा सर्वांची साथ हवी, असे सांगत राहुल यांनी अमेठीवासियांना त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. 

राहुल गांधी यंदा अमेठी आणि केरळचा वायनाड अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. देशभरात प्रचार करायचा असल्याने राहुल यांना अमेठीकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. भाजपनेही याठिकाणी स्मृती इराणी यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवून कडवे आव्हान निर्माण केले आहे. 

काँग्रेससाठी यंदा अमेठीचा पेपर कठीण

या पार्श्वभूमीवर राहुल यांनी अमेठीवासियांना साद घातली आहे. मी देशाला चारी दिशांनी देशाला एकत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. भाजपला केंद्रात श्रीमंतांचे सरकार आणायचे आहे. त्यामुळे एका बाजूला गरीब, शेतकरी, लहान व्यापारी आणि तरुणांच्या कल्याणासाठीची काँग्रेसची विचारसरणी आहे. तर दुसऱ्या बाजूला १५-२० उद्योगपतींच्या इशाऱ्यावर चालणारे सरकार आणू पाहणारी भाजपची विचारसरणी आहे. भाजप लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहे. अमेठीतील लोकांना खोटी आश्वासने दिली जात आहेत. याठिकाणी पाण्यासारखा पैसा वाटला जातोय. परंतु, सच्चेपणा आणि साधेपणा ही अमेठीची खरी ताकद असल्याचे भाजपला अद्याप उमगलेले नाही. त्यामुळे माझा अमेठीतील जनतेवर पूर्णपणे विश्वास असल्याचे राहुल यांनी सांगितले.