पाकिस्तानचा मसूद अजहरला दणका; संपत्ती गोठवण्याचे आदेश, प्रवासावरही निर्बंध

पाकिस्तानकडून आता मसूद अजहरभोवतीचा फास आवळायला सुरुवात झाली आहे. 

Updated: May 3, 2019, 05:47 PM IST
पाकिस्तानचा मसूद अजहरला दणका; संपत्ती गोठवण्याचे आदेश, प्रवासावरही निर्बंध title=

लाहोर: संयुक्त राष्ट्रसंघाने मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित केल्यानंतर आता पाकिस्ताननेही त्याच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानकडून शुक्रवारी मसूद अजहरची संपत्ती गोठवण्याचे अधिकृत आदेश देण्यात आले असून त्याच्या प्रवासावरही निर्बंध घालण्यात आल्याचे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने दिले आहे. याशिवाय, मसूद अजहरला शस्त्रास्त्रांचे व्यवहार करण्यासही मनाई करण्यात आल्याचे समजते. 

भारताच्या दहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर बुधवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीने मसूद अजहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. यानंतर साहजिकच मसूद अजहरवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवरील दबाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून आता मसूद अजहरभोवतीचा फास आवळायला सुरुवात झाली आहे. त्यानुसार पाकच्या सुरक्षा आणि विनिमय आयोगाकडून (एसईसीपी) देशातील सर्व बिगरबँकिंग आर्थिक संस्था आणि नियामक यंत्रणांना मसूद अजहरची गुंतवणूक गोठवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मसूद अजरवर काय कारवाई केली, यासंबंधीचा अहवालही तीन दिवसांच्या आतमध्ये सादर करण्याचे आदेश 'एसईसीपी'ने दिले आहेत.

मसूद अजहर जागतिक दहशतवादी घोषित झाल्याने भारताला काय मिळाले?- ओवैसी

मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात चीनकडून वारंवार अडथळा आणला जात होता. मात्र, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीमधील अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या देशांनी भारताची बाजू उचलून धरली होती. त्यामुळे चीनवर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण झाला होता. अखेर या दबावापुढे नमते घेत चीनने मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठीचा तांत्रिक विरोध मागे घेतला होता. परिणामी भारताच्या दहा वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले. हा निर्णय म्हणजे भारताच्या कुटनीतीचा मोठा विजय असल्याचे मानले जाते.