Indian Railway Interesting Facts: किबोर्डवरची बटणं A,B,C,D अशी सरळ क्रमाने का नाहीत किंवा रुग्णवाहिकेचा रंग पांढराच का असतो किंवा किबोर्डवरील एफ आणि जे बटणांवरच ओळ का दिलेली असते असे प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी नक्कीच पडले असतील. मात्र या साऱ्या गोष्टींमागे काही ना काही कारण असतं. रोजच्या वापरातील तसेच रोज दिसणाऱ्या अशा अनेक गोष्टींमागील कारणं ही फारच रंजक असतात. अशीच एक गोष्ट म्हणजे भारतीय रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर लिहिलेलं X हे अक्षर. तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं तर प्रत्येक लांब पल्ल्याच्या गाडीच्या मागच्या डब्यावर X अक्षर लिहिलेलं दिसेल. सामान्यपणे हे X अक्षर पिवळ्या रंगाने लिहिलेलं असतं.
मात्र प्रत्येक रेल्वेच्या शेवटच्या डब्याच्या मागील बाजूस हे X अक्षर का लिहिलेलं असतं याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? असेल तरी त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच सहजपणे सापडलं नसेल. पण या X अक्षराबद्दल आता भारतीय रेल्वेनेच अधिकृतपणे माहिती दिली आहे. भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय रेल्वे मंत्रालयाने ट्वीटरवरुन या X चं गुपीत सांगितलं आहे.
भारतीय रेल्वे मंत्रालयाने केलेल्या ट्वीटमध्ये शेवटच्या डब्याचा फोटो पोस्ट करण्यात आला आङे. या डब्यावर X असं अक्षर लिहिल्याचं दिसत आहे. डिड यू नो म्हणजेच तुम्हाला ठाऊक आहे का पद्धतीच्या या पोस्टमध्ये या X मागील कारण रेल्वेनं सांगितलं आहे. "X अक्षर असं निर्देशित करतं की हा या ट्रेनचा शेवटचा डब्बा आहे. हा डब्बा पाहिल्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांना खात्री होते की संपूर्ण ट्रेन या रेल्वे स्थानकावरुन गेली असून ट्रेनला जोडण्यात आलेला एकही डबा मागे सुटलेला नाही," असं या पोस्टमधील फोटोवर म्हटलं आहे.
Did you Know?
The letter ‘X’ on the last coach of the train denotes that the train has passed without any coaches being left behind. pic.twitter.com/oVwUqrVfhE
— Ministry of Railways (@RailMinIndia) March 5, 2023
याचाच अर्थ असा की एखादी ट्रेन एखाद्या स्थानकावरुन गेली आणि शेवटच्या डब्याच्या मागे X अक्षर नसेल तर काही डब्बे मध्येच सुटले आहेत. असं आढळून आल्यास संबंधित रेल्वे स्थानकावरील अधिकारी आणि कर्मचारी तातडीने आधीच्या स्थानकाशी संपर्क साधून यासंदर्भातील माहितीची देवाण घेवाण करतात. रात्रीच्या वेळीही हे अक्षर स्पष्टपणे दिसावं म्हणून ते पिवळ्या रंगामध्येच लिहिलेलं असतं.