मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशच्या १० आणि उत्तराखंडच्या एका जागेसाठी राज्यसभा निवडणुका ९ नोव्हेंबरला होणार आहेत. यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख उद्या आहे. भाजपाने उत्तर प्रदेशातून माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचा मुलगा नीरज शेखर आणि केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे नाव दिले आहे.
उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या १० खासदारांची मुदत २५ नोव्हेंबरला संपत आहे. या नेत्यांमध्ये भाजपचे अरुण सिंह, नीरज शेखर, हरदीपसिंह पुरी, समाजवादी पक्षाचे जावेद अली खान, राम गोपाल यादव, चंद्रपालसिंह यादव, रवी प्रकाश वर्मा, बसपाचे राजाराम, वीर सिंह, काँग्रेसचे पीएल पुनिया यांचा समावेश आहे.
तसेच उत्तराखंडमधून काँग्रेस नेते राज बब्बर यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या दहा जागांच्या निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार रामजी गौतम यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उत्तर प्रदेशमधील राज्यसभेसाठी भाजपाचे आठही उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे कारण पक्षाला राज्य विधानसभेत स्पष्ट बहुमत आहे. त्याचप्रमाणे उत्तराखंडमधील राज्यसभेसाठी पक्षाच्या उमेदवारानेही विजयी होण्याची शक्यता आहे. या नऊ नवीन सदस्यांसह, राज्यसभेतील भाजपची स्वत: ची संख्या २४५ सदस्यांच्या सभागृहात ९० च्या पुढे जाईल.
उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या ज्या जागा रिक्त पडत आहेत, त्यापैकी भाजपचे तीन, समाजवादी पक्षाच्या चार, बहुजन समाज पक्षाच्या दोन आणि काँग्रेसची एक जागा आहे.