RBI Monetary Policy 2023 : देशातील बँकांची बँक आणि केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आपलं पतधोरण जाहीर केलं आहे. आरबीआयने रेपो रेट (Repo Rate) वाढवला असून यंदा 0.25 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. रेपो रेट 6.25 वरुन 6.50 झाला आहे. त्यामुळे घराचे हफ्ते, वाहन कर्जावरील हफ्त्यांमध्येही वाढ होणार आहे. मे महिन्यापासून आतापर्यंत अडीच टक्क्यांनी रेपो रेट वाढला आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये केलेली ही सलग सहावी वाढ आहे.
आरबीआयचे गव्हर्नर शशीकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी आज रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आल्यासंदर्भातील माहिती दिली. जागतिक पातळीवरील आर्थिक स्थिती ही काही महिन्यांपूर्वी होती तशी निराशाजनक नाही. मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये चांगली वाढ दिसून आली आहे. महागाईचा दर कमी होत असला तरी अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांचा विचार करता महागाईचा दर हा चिंतेचा विषय आहे, असंही शशिकांत दास यांनी म्हटलं.
मागील तीन वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे जागतिक स्तरावरील पतधोरणावर परिणाम झाला आहे. विकासनशील अर्थव्यवस्थांना व्यापारामध्ये या काळात मोठा फटका बसल्याने आर्थिक व्यवहार आणि महागाईवर नियंत्रण ठेवण्यास प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून आलं, असं दास यांनी म्हटलं आहे.
RBI Governor Shaktikanta Das announces that RBI increases the repo rate by 25 basis points to 6.5% pic.twitter.com/2ZyUSbCxEO
— ANI (@ANI) February 8, 2023
रेपो रेट वाढल्याने आता गृहकर्जावरील हफ्ते म्हणजेच ईएमआय वाढणार आहे. गृहकर्जावरील व्याज मागील 9 महिन्यांमध्ये 2.50 टक्क्यांनी वाढलं आहे. वाहनकर्ज आणि इतर कर्जांवरील हफ्त्यांमध्ये वाढ होणार असल्याने कर्जदारांना आपला खिसा अधिक खाली करावा लागणार आहे.