नवी दिल्ली : डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाइन पद्धतीने होणारी ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आर्थिक व्यवहार सुरक्षित करण्यासाठी आपली नवी सेवा सुरु केली आहे. एसएमएस (SMS) च्या माध्यमातून किंवा मिस्ड कॉलच्या माध्मयातून हेल्पलाईन सुविधा सुरु करण्यात आली आहे.
केंद्रीय बँकांद्वारे ग्राहकांना पाठवण्यात येणाऱ्या एसएमएसमध्ये म्हटलं आहे की, "मोठी रक्कम मिळण्याच्या आश्वासनांना बळी पडू नका आणि असं आश्वासन देणाऱ्या व्यक्तीकडे कुठल्याही प्रकारची रक्कम जमा करु नका. रिझर्व्ह बँक, बँकेचे गव्हर्नर किंवा सरकारही अशा कुठल्याच प्रकारचा एमएमएस, ई-मेल किंवा करत नाही."
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)ने ग्राहकांच्या मदतीसाठी मिस्ड कॉल हेल्पलाईन सुरु केली आहे. ८६९१९६०००० या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.
८६९१९६०००० या क्रमांकावर मिस्ड कॉल करताच तुम्हाला अवघ्या काही वेळातच पुन्हा कॉल येईल. या कॉलच्या माध्यमातून विस्त्रृत माहिती दिली जाते. या कॉलच्या माध्यमातून सायबर सेल तसेच स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल करण्यासंदर्भातही माहिती दिली जाते.
ई-मेल, एसएमएस किंवा कॉलच्या माध्यमातून ग्राहकांना रिझर्व्ह बँकेचं नाव सांगुन पुरस्कार तसेच लॉटरी लागण्यासारखे आमिष देण्यात येतात. अशा घटनांमध्ये अनेक नागरिक बळी पडतात आणि लॉटरी, पुरस्कार मिळवण्याच्या नादात आपल्याकडील पैसा गमवून बसतात.