चौकीदाराची चौकशी झालीच पाहिजे; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

अंबानींना पैसे मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांनी फ्रान्स सरकारशी स्वतंत्रपणे बोलणी केली.

Updated: Mar 7, 2019, 10:18 AM IST
चौकीदाराची चौकशी झालीच पाहिजे; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल title=

नवी दिल्ली: राफेल गैरव्यवहारप्रकरणी देशाच्या चौकीदाराची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते गुरुवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी राफेलच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी झाली होती. त्यावेळी केंद्र सरकारने संरक्षण मंत्रालयातून राफेलच्या कागदपत्रांची चोरी झाल्याचा खुलासा केला होता. यावरून टीका करताना राहुल गांधी यांनी म्हटले की, ही कागदपत्रे चोरीला गेली म्हणजे त्यामध्ये काहीतरी काळबेरं होतं. यामध्ये करारासंबंधात वाटाघाटी करणाऱ्या भारतीय पथकाने (इंडियन नेगोशिएटिंग टीम – आयएनटी) स्पष्टपणे पंतप्रधान कार्यालयाच्या हस्तक्षेपाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या कराराबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून फ्रान्सशी समांतर बोलणी सुरू असल्यामुळेच राफेल विमानांची किंमत वाढली आणि विमाने मिळण्यास उशीर झाल्याचा शेराही नेगोशिएटिंग टीमने नोंदवला होता. मात्र, आता सरकारकूडन ही कागदपत्रे जगासमोर आणणाऱ्यांना गोपनीयता कायद्याच्या धाक दाखवला जात आहे. सरकारने सगळ्यांची चौकशी करावी. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही चौकशीतून वगळले जाऊ नये, असे राहुल यांनी म्हटले. 

अनिल अंबानी यांना ३० हजार कोटी रुपये मिळावेत, यासाठीच पंतप्रधानांनी फ्रान्सशी समांतर बोलणी केली. या सगळ्यामुळे विमानांची किंमत वाढली आणि ती मिळण्यासही उशीर झाला. संरक्षण मंत्रालयातून कागदपत्रांची चोरी झाली होती तर त्याचवेळी गुन्हा का नोंदवण्यात आला नाही, असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

मोदींविरोधात पुरावे मिळाले आता खटला भरायची वेळ- राहुल गांधी

नेगोशिएटिंग टीमकडून पंतप्रधान कार्यालयाच्या हस्तक्षेपाबद्दल कागदपत्रांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाची सूत्रे पंतप्रधानांच्या हातात असतात. अशावेळी इतरांवर जबाबदारी ढकलून मोदींना नामनिराळे राहता येणार नाही. राफेलच्या कागदपत्रांमध्ये पंतप्रधान कार्यालयावर ठपका ठेवला असेल तर मोदींची फौजदारी चौकशी का होत नाही? याउलट पंतप्रधानांच्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकावर कारवाई केली जात असल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली.