उत्तरप्रदेश : केंद्र सरकारने देशातील गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. त्यापैकीच एक आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. आर्थिक दुर्बलतेमुळे मोठ्या आणि गंभीर आजारांवर जे उपचार घेऊ शकत नाहीत अशा लोकांसाठी लागू करण्यात आलेली हि योजना.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत गरीब लोकांना कोणत्याही गंभीर आजारावर उपचार घेता येणार आहेत. पण, यासाठी तुमच्याकडे आयुष्मान कार्ड असणे गरजेचे आहे. मात्र, हे कार्ड बनविण्यासाठी सरकारे कार्यालयात गरीब जनतेला खुपच फेऱ्या माराव्या लागत होत्या.
मात्र, उत्तर प्रदेश सरकारने यासाठी एक नवा निर्णय घेतला आहे. ज्यांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड घ्यायचे आहे. त्यांना हे कार्ड त्यांच्या जवळील असलेल्या सरकारी रेशन दुकानांवर मिळणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, यूपीच्या जिल्ह्यांतील सरकारी रेशन दुकानांमध्ये आयुष्मान कार्ड बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी व्हर्च्युअल लर्निंग एन्व्हायर्नमेंट ( VLE ) अधिकृत करण्यात आले आहे. या प्रक्रियेअंतर्गत रेशन दुकानांवर आयुष्मान कार्ड बनवण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी पात्रताही तपासली जाईल.
सध्या ही सुविधा उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ, गोरखपूर आणि प्रयागराजमध्ये लागू केली आहे. तर, येत्या काही महिन्यांत त्याची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी होणार आहे.
काय आहे आयुष्मान भारत योजना!
1 एप्रिल 2018 रोजी संपूर्ण भारतात लागू करण्यात आलेली आयुष्मान भारत योजना ही केंद्र सरकारची आरोग्य योजना आहे. तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2018 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेची घोषणा केली होती.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंतचा कॅशलेस आरोग्य विमा प्रदान करण्यात आला आहे. यामुळे गरीब आणि नोकरदार वर्गाला सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार पूर्णपणे मोफत मिळू शकतात. या उपचाराचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार असून ही देशातील सर्वात मोठी आरोग्य संरक्षण योजना आहे.