संस्कारी जोडीदार हवा असेल तर मुस्लीम स्त्रियांनी हिंदू पुरुषांशी लग्न करावे- साध्वी प्राची

जो समाज केवळ महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करतो, त्या समाजाचा त्याग करा.

Updated: Aug 2, 2018, 07:22 AM IST
संस्कारी जोडीदार हवा असेल तर मुस्लीम स्त्रियांनी हिंदू पुरुषांशी लग्न करावे- साध्वी प्राची title=

लखनऊ: हलालासारख्या कुप्रथेपासून स्वत:ला वाचवायचे असेल तर मुस्लीम स्त्रियांनी हिंदू पुरुषांशी लग्न करावे, असे मत विहिंपच्या नेत्या साध्वी प्राची यांनी व्यक्त केले. त्या मंगळवारी लखनऊमधील एका कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांनी कावड यात्रा आणि मुस्लीम समाजातील बुरसटलेल्या चालीरितींवर भाष्य केले. साध्वी प्राची यांनी म्हटले की, मुस्लीम महिलांनी हिंदू धर्म स्वीकारला तर त्यांना हलाला किंवा तिहेरी तलाकसारख्या गोष्टींचे भय राहणार नाही. जो समाज केवळ महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करतो, त्या समाजाचा त्याग करा. मुस्लीम स्त्रियांनी हिंदू पुरुषांशी लग्न करावे. तुम्हाला खूप संस्कारी मुले मिळतील, असे साध्वी प्राची यांनी म्हटले. 
 
फतवे काढून स्त्रियांना सतत धमकावणाऱ्या आणि सन्मानाने जगण्याचा त्यांचा हक्क हिरावून घेणाऱ्या समाजाचा त्याग करुन मुस्लीम स्त्रियांनी त्या धर्माच्या तोंडावर सणसणीत चपराक मारावी, असे आवाहनदेखील साध्वी प्राची यांनी केले. 

याशिवाय, सध्या सुरु असलेल्या कावड यात्रेदरम्यान उत्तर प्रदेशातील मशिदींवरील भोंगे बंद करण्याचे आदेश काढण्यात यावेत, अशी मागणीही साध्वी प्राची यांनी केली. आपण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तशी विनंतीही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.