मुंबई : कोरोनामुळे गेली 2 वर्ष फार वाईट गेली. कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. अनेकांना कमी पगारात काम करावं लागलं. कोरोनामुळे अनेकांची पगारवाढ ही रोखली गेली. मात्र आता नोकरदारांसाठी एक गूड न्यूज आहे. नोकरदारांसाठी 2022 हे वर्ष आनंददायी ठरणार आहे. कारण यंदाच्या वर्षी तुमचा पगार वाढणार आहे. हे आम्ही केलेलं भाकीत नाही. तर एका ग्लोबल कंपनीचा अहवाल आहे. नेमका कसा वाढेल तुमचा पगार, हे आपण जाणून घेऊयात. (salary increment in 2022 years by 10 percent as per korn ferry india latest annual rewards survey)
2022 मध्ये 10 टक्के पगार वाढणार?
डेल्टा कोरोनाची लाट ओसरली. ओमायक्रॉनची लाटही हळुहळु कमी होतेय. कोरोना महामारीमुळं गेल्या 2 वर्षांत घसरलेली अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा एकदा रूळावर येते आहे. कंपन्या पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरु झाल्या. कंपन्यांचा नफा वाढतोय. त्यामुळेच यंदाच्या वर्षी 10 टक्के पगारवाढ होईल, असा दिलासादायक अहवाल कॉर्न फेरी इंडिया या ग्लोबल कन्सल्टन्सी कंपनीनं दिला आहे.
कोरोनाच्या आधी 2019 मध्ये पगारात सरासरी 9 टक्के वाढ व्हायची. कोरोनाच्या महामारीत 2020 मध्ये हा आकडा 7 टक्के एवढा कमी झाला. 2021 मध्ये सरासरी 8.4 टक्के इतकी पगारवाढ झाली. तर यंदाच्या वर्षी 10 टक्के पगारवाढ होईल, असा अंदाज कॉर्न फेरी इंडियानं (korn ferry india latest annual rewards survey)वर्तवला आहे.
कोरोनाची लाट ओसरल्यानं लॉकडाऊनचे निर्बंध कमी झालेत. कंपन्या आणि ग्राहक दोघांचाही विश्वास वाढलाय. सध्या प्रत्येक क्षेत्रात वेगानं तेजी येतेय. कंपन्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना होईल, अशी अपेक्षा आहे.
कंपन्या नफ्याचा काही भाग पगारवाढीसाठी खर्च करतील. समारे 46 टक्के कंपन्या पगारवाढीसह इतरही सुविधा देतील. वर्क फ्रॉम होमसाठी ४३ टक्के कंपन्या आवश्यक सुविधा देतील. त्यामध्ये वायफाय तसंच वीजबिल खर्चाचा समावेश असेल. तब्बल ४० टक्के लोक नोक-या बदलतील, अशीही शक्यता आहे. अशा लोकांना थांबवण्यासाठी कंपन्या जादा पगार देतील, असं या अहवालात म्हटलंय.
ज्या कंपन्यांमध्ये पगारवाढ होणार आहे. त्यात प्रामुख्यानं टेक कंपन्यांचा समावेश आहे. ऑटो, केमिकल आणि हेल्थकेअर क्षेत्रातल्या नोकरदारांनाही चांगली पगारवाढ होणार आहे. त्यामुळं नोकरदार वर्गाची यंदाच्या वर्षी तरी बल्ले बल्ले होणार आहे.