Inheritance Tax In india : सॅम पित्रोदा... अनिवासी भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष... माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळातील आयटी क्रांतीचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या एका वक्तव्यामुळं वादाची नवी ठिणगी पेटलीय. अमेरिकेप्रमाणं भारतातही वारसा संपत्ती कर (Sam Pitroda Suggests Inheritance Tax) लावावा, अशी मागणी सॅम पित्रोदांनी केलीय. त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. त्यांच्या वक्तव्यामुळे आता काँग्रेसची कोंडी झालीये. याचा फटका काँग्रेसला निवडणुकीत बसणार की काय? असा सवाल देखील विचारला जात आहे. ते नेमकं काय म्हणाले, ते पाहूया...
याचाच अर्थ हा कायदा भारतात लागू झाल्यास एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची 45 टक्के संपत्ती मुलांना किंवा वारसांना मिळेल. तर 55 टक्के संपत्ती सरकारजमा होईल. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपनं काँग्रेसवर टीकेची तोफ डागलीय. दरम्यान, हे पित्रोदांचं वैयक्तिक मत आहे, काँग्रेसची भूमिका नाही, असा खुलासा आता काँग्रेस नेत्यांनी केलाय.
भाजप नेत्यांनी जोरदार हल्ला चढवल्यानंतर काँग्रेस बॅकफूटवर आलीय. आधीच जाहीरनाम्यातील उल्लेखांवरून भाजपनं काँग्रेसला टार्गेट केलंय. आता सॅम पित्रोदांच्या वक्तव्यामुळं काँग्रेसची कोंडी झालीय. पंतप्रधान मोदींनी पित्रोदांच्या वक्तव्यावर टीका केली. काँग्रेसचे घातक इरादे आता समोर येऊ लागले आहेत, याची जाणीव तुम्हाला झाली असेल. आता ते वारसा हक्क कर लागू करण्याची भाषा बोलू लागले आहेत. ज्यांनी कधीकाळी शहजादे यांच्या वडिलांना सल्ला देण्याचे काम केले तेच आता शहजादेंना सल्ला देत आहेत, असं मोदी म्हणाले.
काय आहे वारसा हक्क कर?
अमेरिकेत जर एखाद्या व्यक्तीकडे दहा कोटी डॉलर एवढी मालमत्ता असेल तर त्याच्या मृत्यूनंतर ती संपत्ती वारसदाराला देताना त्याला फक्त 45 टक्के रक्कम मिळते, तर उर्वरित 55 टक्के रक्कम ही सरकारकडे जमा होते. सॅम पित्रोदा याच मुद्द्यावरून बोलले असताना त्यांच्यावर आता सर्वबाजूने टीका होताना दिसत आहे. जपानमध्ये वारसा कर 55 टक्के, दक्षिण कोरियामध्ये 50 टक्के, जर्मनीमध्ये 50 टक्के, फ्रान्समध्ये 45 टक्के, इंग्लंडमध्ये 40 टक्के, स्पेनमध्ये 34 टक्के तर आयर्लंडमध्ये हा कर 33 टक्के आहे.