'भाजपवर मुंडण करून स्वतःचे श्राद्ध घालण्याची वेळ '; सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय? पाहा जसं च्या तसं...

Loksabha Election 2024 :  भटकती आत्मापासून नकली संतान... सामनाच्या अग्रलेखातून वाचला नवा पाढा... भाजपवर ठाकरे गटाकडून टीकेची झोड.  

सायली पाटील | Updated: Jun 8, 2024, 09:54 AM IST
'भाजपवर मुंडण करून स्वतःचे श्राद्ध घालण्याची वेळ '; सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय? पाहा जसं च्या तसं...  title=
samana editorial latest news shivsena thackeray group targets bjp nda alliance over majority loksabha Election 2024 latest updates

Loksabha Election 2024 :  शिवसेनेच्या ठाकरे (Shivsena) गटाचं मुखपत्र असणाऱ्या 'सामना'तून उद्धव ठाकरे गटानं पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. बहुमत गाठताना मोदी शाहांची दमछाक झाल्याचा टोला सामनाच्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. बहुमताचा आकडा गाठताना मोदींनी जे ठरवलं त्यातलं काहीच होऊ न शकल्यामुळं त्यांचा तोरा उतरला अशा शब्दांत टीकेचा सूर आळवण्यात आला आहे. 

मोदींचं बोलणं आणि डोलणं सर्वकाही खोटं असून, त्यांनी केलेलं तप, ध्यान हे सर्वकाही दिखाव्यासाठी असल्याची थेट विधानं या अग्रलेखातून करण्यात आली आहेत. सत्तेसाठी (PM Modi) मोदींनी पक्ष फोडले आणि आता काही तडजोडी केल्या, (Congress) काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भारत 'भाजपमुक्त' झाला असं म्हणत मोदींना जगभरातून येणाऱ्या शुभेच्छांसंदर्भात ठाकरे गटाकडून उपरोधिक स्वरात आश्चर्य व्यक्त करण्यात आलं आहे. 

'सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठताना मोदी-शहा यांची दमछाक झाली. मोदी यांचा तोरा उतरला. मोदी यापुढे हिंदुत्वाचा ‘हि’सुद्धा तोंडातून काढू शकणार नाहीत. मोदी यांनी जे ठरवले तसे काहीच झाले नाही. कारण मोदी यांचे बोलणे व डोलणे सर्वच खोटे होते. त्यांचे तप, ध्यान हे ढोंग होते. सत्तेसाठी मोदी यांनी आधी पक्षफोडी केली, आता तडजोडी केल्या. कारण ‘काँगेसमुक्त भारत’ करण्याच्या फंदात अर्धा भारत ‘भाजपमुक्त’ झाला व मोदींचा तोरा कुबडय़ांवर लटकला आहे. ‘इंडिया’ने ‘बहुमतमुक्त भाजप’ हे सत्य कृतीत आणले. तरीही मोदी यांना म्हणे जगभरातून अभिनंदनाचे संदेश येत आहेत असा दावा त्यांचे लोक करतात. हे आश्चर्यच आहे!', असं अग्रलेखात लिहिल्याचं आढळलं. 

हेसुद्धा वाचा : चंद्राबाबू नायडूंच्या कुटुंबाला 8700000000 रुपयांची लॉटरी, पत्नी मालामाल; पाच दिवसांत कशी वाढली इतकी संपत्ती? 

भाजपच्या बहुमताचं मुडकं काँग्रेसनं उडवलं असून, जवळपास 9 राज्यांमधून भाजप हद्दपार झाल्याची वस्तुस्थिती या अग्रलेखातून मांडम्यात आली. उत्तर प्रदेशसारख्या राज्यांतून भाजपला भविष्यातील बिकट वाट दाखवण्यात आली असून, महाराष्ट्रातही ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं महाराष्ट्रातील भाजपवर 'मुंडण करून स्वतःचे श्राद्ध घालण्याची वेळ' आणली आहे असा घणाघात या अग्रलेखातून करण्यात आला.  

मोदींच्या गुजरातमध्ये काँग्रेसनं फोडला घाम 

'देशातील हे गणित पाहिले तर ‘काँग्रेसमुक्त भारत’ या नारेबाजीची साफ शकले उडाली आहेत. मोदी-शहांच्या गुजरातमध्ये काँग्रेसने खाते उघडले व अनेक मतदारसंघांत काँग्रेस उमेदवारांनी भाजप उमेदवारांना घाम फोडला. काँग्रेसचे योगदान मानायला मोदी तयार नव्हते. स्वातंत्र्यलढय़ात, देशाच्या प्रगतीत काँग्रेस कोठेच नाही असे मोदीकृत नव भाजपचे म्हणणे होते, पण या वेळी काँग्रेसने शंभर जागांचा टप्पा पार करून मोदी यांचा तर्क खोटा पाडला.'

पुन्हा भटकती आत्मा अन् भटकती संतान... 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शरद पवारांसाठी भटकती आत्मा आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी नकली संतान असे शब्द वापरण्यात आले होते. पण, ''त्याच भटकत्या आत्म्याने व नकली संतानाने महाराष्ट्रातून भाजपचे ‘पिंड’ कावळय़ासह उडवून लावले व बहुमत गमावलेला मोदींचा आत्मा प्रादेशिक पक्षांच्या पिंपळावर लटकलेला दिसत आहे'' अशा शब्दांत ठाकरे गटाकडून भाजपचा समाचार घेत ज्या चिराग पासवान यांच्या ‘लोजपा’पक्षात फोडाफोडीचं राजकारम करण्यात आलं त्याच चिराग पासवान यांच्या टेकूवर मोदी सत्ता स्थापन करत आहेत याची आठवण करून दिली.