नवी दिल्ली : दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्तानं राजपथावर वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ पाहायला मिळाले.
यात महाराष्ट्राच्या चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा रंगवण्यात आला होता. हा चित्ररथ समोर येताच कोल्हापूरचे खासदार संभाजीराजेंनी जोरदार घोषणाबाजी केलेली पाहायला मिळाली.
या सोहळ्यासाठी राज्यसभा खासदार आणि शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे पत्नीसह उपस्थित होते... राजपथावरून महाराष्ट्राचा शिवराज्याभिषेकाचा चित्ररथ समोर आला... 'तेज तम अस पर। कान्ह जिमि कंस पर। त्यों मलिच्छ बंस पर । सेर सिवराज है।' या काव्याचं उच्चारण करण्यात आलं.... आणि शिवाजी महाराज आणि शानदारपणे फडकणारा भगवा समोर दिसला...
हे दृश्य नजरेत येताच संभाजीराजे सपत्नीक उभे राहिले आणि त्यांनी 'शिवाजी महाराज की जय' म्हणत जोरदार घोषणाबाजी केली.
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावरील हे दृश्यं उभारण्यात आली होती. महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती असून त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आलेली आहे. तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती असून त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झालेले दाखवण्यात आले. या ठिकाणी आभूषण देणारा दरबारी, त्याच्या शेजारी गागाभट्ट, तर या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिजन दाखवण्यात आले.