SBI ने व्याज दरात केली कपात, होम लोन स्वस्त

SBI ची दर कपात १० जुलैपासून लागू होणार आहे. त्यामुळे होम लोन, कार लोन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Updated: Jul 8, 2020, 02:38 PM IST
SBI ने व्याज दरात केली कपात, होम लोन स्वस्त

मुंबई : कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे अनेक जण संकटात आले आहेत. कर्जाचे हप्ते भरायचे कसे, अशी चिंता असताना स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) व्याज दरात कपात करत दिलासा देणारी बातमी दिली आहे. SBI ची दर कपात १० जुलैपासून लागू होणार आहे. त्यामुळे होम लोन, कार लोन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

SBI ने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्सवर आधारित कर्जदरात (MLCR) ०.०५ ते ०.१० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. १० जुलैपासून हे नवे दर लागू होणार आहेत. स्टेट बँकेकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मागील महिन्यात देखील SBI ने MLCR कर्ज दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली होती. त्यापूर्वी ०.१५ टक्के अशी आतापर्यंत SBI ने १४ वेळा MLCR च्या व्याजदरात कपात केली आहे. 

MLCR च्या व्याजदरात कपातामुळे जुलैच्या दहा तारखेपासून होम लोन आणि कार लोन कमी दरात उपलब्ध होईल. तसेच MLCR शी संबंधित कर्जाचे हप्ते, ईबीआर कमी होईल. स्टेट बँकेचे सध्याचे MLCR चे व्याज दर सर्वात कमी असल्याचा दावाही SBI ने  केला आहे. 

या कपातीनंतर स्टेट बँकेचा वार्षिक EBR ७.०५टक्क्यांवरून ६.६५ टक्क्यांवर आला आहे. यापूर्वी  बँक ऑफ इंडिया, युको बँक आणि पंजाब नॅशनल बँक यांनीही रेपोसंलग्न कर्जदर आणि एमसीएलआर दर कमी केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे.