मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. एसबीआयने ग्राहकांना आणखी एक खुशखबरी दिली आहे. बँकेने व्याजदर आणखी कमी केलं आहे. एसबीआयने ०.१० टक्क्यांनी व्याजदर कमी केलं आहे. यामुळे होम लोन आणखी स्वस्त होणार आहे.
एसबीआयचे हे नवे व्याजदर १० ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. एका वर्षात लोनचं एलसीएलआर कमी होऊन ८.०५ टक्क्यांवर आलं आहे. पण रेपो रेटशी संबंधित लोनवर हे लागू नाही होणार. यावर्षी सहाव्यांदा एसबीआयने एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने मागील आठवड्यात रेपोरेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी कपात केली होती.
रेपो रेट कमी झाल्यामुळे व्याजदर कमी करण्याचा देखील दबाव असतो. रेपो रेट तो दर असतो ज्यावर आरबीआय बँकांना कर्ज देते. हा रेट जेवढा कमी होणार तेवढा फायदा बँकांना होतो. तर बँक देखील ग्राहकांना याचा फायदा देण्यासाठी व्याजदर कमी करते.
आरबीआयकडून देखील अनेकदा रेपोरेटमध्ये कपात करण्यात आली आहे. पण काही बँका ग्राहकांना याचा फायदा होऊ देत नाही. पण १ ऑक्टोबरपासून सगळ्याच बँकांना रेपो रेटमधील कपातीचा फायदा ग्राहकांना देणं अनिवार्य झालं आहे.
आरबीआयने बँकांना कर्ज रेपो रेट सोबत जोडण्यास सांगितलं होतं. पण बँकांकडे अजूनही रेपो रेटवर आधारित लोन शिवाय एमसीएलआरवर आधारित लोन देण्याची सूट आहे. ज्यामुळेच एसबीआयने एमसीएलआर आधारित लोनवर देखील कपात करत ग्राहकांना याचा फायदा देण्याचा निर्णय घेतला आहे.