काश्मीर खोऱ्यात आजपासून शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरु

काश्मीर खोऱ्यात शाळा, महाविद्यालये आजपासून सुरु करण्यात आली आहेत.  

Updated: Oct 9, 2019, 01:49 PM IST
काश्मीर खोऱ्यात आजपासून शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरु title=

श्रीनगर : केंद्र सरकारने अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर कोणाताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निर्बंध आणले होते. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठेही बंद होती. आजपासून खोऱ्यात ती सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे येथे शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरु होती. सकाळी शिक्षक, प्राध्यापक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जात असतांना दिसत होते. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा दलांना अनेक महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये तैनात केले होते.

शाळा आणि महाविद्यालय सुरु झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून आम्हाला त्रास सहन करावा लागला आहे. आम्हाला पुन्हा शिक्षण मिळेल की नाही, याची भीती वाटत होते. शिक्षण परत मिळविणे अवघड वाटत होते. मात्र, आता शाळा, महाविद्यलये सुरु झाल्याने चिंता मिटली आहे, श्रीनगरमध्ये बारावीत शिकत असलेल्या अकीबने सांगितले.

दरम्यान, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल यांच्यासोबत सोमवारी झालेल्या बैठकीत ऑगस्टपासून शिक्षणाचा प्रश्नही गंभीरपणे उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर परिस्थितीचा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार काही प्रमुख निर्णयांमध्ये उच्च माध्यमिक शाळा पुन्हा सुरू करणे आणि महाविद्यालये सुरु करण्यातबाबत विचार झाला. त्यानुसार केंद्रीय शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. तसे अधिकृत जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

शाळा, महाविद्यालय सुरु झाली तरी काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविलेले नाही. काही पालकांनी सांगितले, पालक म्हणून मी माझ्या मुलांना शाळेत पाठवले नाही. कारण ते तिथे आल्यावर मी त्यांच्याशी संपर्क साधणार नाही. कारण मोबाइल सेवा अद्याप बंद आहे. त्यांच्या बसवर कोणी दगडफेक कोणी केली तर, मला कसे समजणार, अशी एका पालकाने चिंता व्यक्त केली.

गेल्या महिन्यात सरकारने शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अपवादात्मक परिस्थितीमुळे आणि बंद तसेच अनिश्चिततेमुळे शाळा सुरु करण्यात आल्या नाहीत.