Hindenburg च्या गंभीर आरोपांवर पहिल्यांदाच आली बुच दाम्पत्याची प्रतिक्रिया, 'त्या' फंडमध्ये गुंतवणूक केली कारण..'

Hindenburg Report News in Marathi:  बुच दाम्पत्याने पहिल्यादांच यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 12, 2024, 11:49 AM IST
Hindenburg च्या गंभीर आरोपांवर पहिल्यांदाच आली बुच दाम्पत्याची प्रतिक्रिया, 'त्या' फंडमध्ये गुंतवणूक केली कारण..' title=
हिंडनबर्गच्या आरोपांवर बुच दाम्पत्याची प्रतिक्रिया

Hindenburg Report News in Marathi:  सिक्योरिटी अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच (Dhaval Buch) यांच्यावर हिंडनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) गंभीर आरोप लावले. बुच दाम्पत्याचे अदानी समुहाशी (Adani Group) संबंध आहेत. अदानी ग्रुपच्या ऑफशोर म्हणजेच विदेशी फंडमध्ये सेबी चेअरपर्सन माधवी पुरी बुच (Madhabi Puri Buch)आणि त्यांच्या पतीची भागीदोरी होती, असा आरोप हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्टमध्ये करण्यात आल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. सोमवारी मार्केट उघडताच या आरोपांचा किती परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान बुच दाम्पत्याने पहिल्यादांच यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

सेबीचे पद संभाळण्याच्या 2 वर्ष आधी वैयक्तिक गुंतवणूकदार म्हणून आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट फंडमध्ये गुंतवणूक करण्यात आली होती, असे बुच दाम्पत्याने म्हटलंय. हिंडनबर्ग रिपोर्टमध्ये ज्या फंडचा उल्लेख करण्यात आलाय, त्यामध्ये 2015 साली गुंतवणूक करण्यात आली होती. तेव्हा आम्ही दोघे सिंगापूरमध्ये राहणारे सामान्य नागरिक होतो. माधबी यांनी सेबीची जबाबदारी संभाळण्याच्या 2 वर्षे आधी करण्यात आली होती.  त्या फंडमधील मुख्य गुंतवणूक अधिकारी अनिल अहूजा हे धवल यांचे लहानपणीचे मित्र आहेत. शाळा आणि आयआयटी दिल्लीपासून त्यांची मैत्री आहे. सिटीबॅंक, जेपी मॉर्गन आणि 3i ग्रुप पीएलसीचे माजी कर्मचारी असल्याने अनेक दशकांपासून त्यांचे गुंतवणूकीचे करिअर मजबूत आहे. कोणत्याही काळात अदानी समुहाच्या कंपनीतील कोणत्याही प्रकारचे बॉण्ड, इक्विटी किंवा डेरिव्हेटीव्हमध्ये गुंतवणूक न केल्याचे अनिल अहुजा यांनी आधीच स्पष्ट केले. 

ब्लॅकस्टोन च्या रियल इस्टेट सेगमेंटशी संबंध नाही

चैन मॅनेजमेंटमधील विशेषज्ञतेमुळे 2019 मध्ये ब्लॅकस्टोन प्रायव्हेट इक्विटीच्या वरिष्ठ सल्लागारपदी धवल यांची नियुक्ती झाली. अशाप्रकारे त्यांची नियुक्ती सेबी अध्यक्ष म्हणून माधबी यांच्या नियुक्तीच्या आधी झाली आहे. ही नियुक्ती सार्वजनिक डोमेनमध्ये आहे. धवल बुच यांचे प्रमुख खासगी इक्विटी कंपनी ब्लॅकस्टोनच्या रियल इस्टेट सेगमेंटशी संबध नाहीत. त्यांच्या नियुक्तीनंतर ब्लॅकस्टोन ग्रुपला तात्काळ सेबीकडे ठेवलेल्या माधबींच्या त्याग यादीत ठेवण्यात आले. 

सेबीमध्ये नियुक्तीनंतर दोन्ही फर्म निष्क्रिय

सेबीमध्ये नियुक्ती मिळाल्यानंतर तात्काळ माधबी यांच्या भारत आणि सिंगापूर येथील दोन कंपन्या इनअॅक्टीव्ह झाल्या. माधबी यांनी याबद्दल स्पष्ट खुलासा केला होता. माधबी यांच्या नियुक्तीच्या नंतर तात्काळ त्यांच्या दोन्ही सल्लागार कंपन्या निष्क्रिय झाल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. 

 माधबी यांच्या पगाराशी संबंध जोडणे चुकीचे

2019 मध्ये धवल यूनिलीव्हरमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी कंपनींच्या माध्यमातून स्वत:ची कन्सल्टन्सी प्रॅक्टीस सुरु केली. सप्लाय चेनमध्ये धवल हे तज्ञ असल्याने त्यांना भारतीय उद्योगामध्ये प्रमुख ग्राहकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. अशाप्रकारे या कंपन्यांनी कमावलेल्या नफ्याचा माधबी यांच्या सध्याच्या सरकारी पगाराशी संबंध जोडणे चुकीचे असल्याचे बुच यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय. सिंगापूरमधील कमाईचे शेअर धवल यांच्याकडे गेले तेव्हा याचा खुलासा पुन्हा सेबीसमोर करण्यात आला. एवढेच नव्हे तर सिंगापूरचे अधिकारी आणि भारतीय कर अधिकाऱ्यांसमोरदेखील हा खुलासा झाल्याचे म्हटलंय. 

हिंडनबर्गला अनेक उल्लंघनांसदर्भात नोटीस 

भारतामध्ये विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हिंडनबर्गला कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. पण ते नोटीसचे उत्तर देत नाहीत हे दुर्देवी आहे. ते सेबीच्या विश्वासर्हतेवर प्रश्न उपस्थित करत असतात, असे बुच दाम्पत्याने म्हटलंय.