पुलवामामध्ये जैशच्या ३ दहशतवाद्यांना कंठस्नान

गेल्या 24 तासात जैश ए मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांना मारण्यात आलं आहे.

Updated: Jun 3, 2020, 11:54 AM IST
पुलवामामध्ये जैशच्या ३ दहशतवाद्यांना कंठस्नान
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील कंगन वानपोरा भागात भारतीय सुरक्षा दलाकडून जैश-ए-मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. दोन्ही बाजूने गोळीबार सुरु होता. सीआरपीएफ आणि 55 राष्ट्रीय रायफल्सच्या संयुक्त पथकाने दहशतवाद्यांविरुद्ध ही कारवाई केली आहे.

गेल्या 24 तासात जैश ए मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांना मारण्यात आलं आहे. मंगळवारी पुलवामामध्येच भारतीय सेनेकडून जैशचे 2 दहशतवादी ठार करण्यात आले होते.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुप्त सुचनेच्याआधारे, ज्यावेळी सर्च ऑपरेशन सुरु होत, त्याचवेळी लपलेल्या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर दोन्ही बाजून गोळीबार सुरु झाला. दहशतवादी लपलेल्या जागेला सुरक्षा दलाकडून घेराव घालण्यात आला होता. दहशतवाद्यांना बाहेर पडण्यास कोणताही मार्ग नव्हता. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंगन वानपोरा भागात 2-3 दहशतवादी लपले असल्याची माहिती आहे. 

कोणतीही अफवा पसरवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून, त्या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. 

दरम्यान, सोमवारी भारतीय सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडला होता. सुरक्षा दलाकडून नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणाऱ्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पाकिस्तानी सेनेचा, या दहशतवाद्यांची भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याची योजना होती. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सेना भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी पाकिस्तानकडून गेल्या अनेक दिवसांपासून नौशेरा, पुंछ आणि हिरानगरसह इतर सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात येत आहे.