बंगळुरू : कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची मंगळवारी सायंकाळी त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ६.३० वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडली. राजाराजेश्वरी नगरमध्ये त्या राहत होत्या. अज्ञात इसमांनी घराची बेल वाजवून दरवाजा उघडताच गौरी लंकेश यांच्यावर गोळीबार केला. छातीवर गोळी लागल्यानं गौरी यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबार करणारे तीन जण असल्याचं समजतंय. हल्ल्यानंतर हे तीघेही फरार झाले.
#Visual of senior journalist Gauri Lankesh shot dead at her residence in Bengaluru's Rajarajeshwari Nagar (Pic Source: Local media) pic.twitter.com/sV2S9DWyjg
— ANI (@ANI) September 5, 2017
धक्कादायक म्हणजे, दोन वर्षांपूर्वी एम कलबुर्गी यांची ज्याप्रकारे हत्या करण्यात आली होती त्याच पद्धतीनं गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आल्याचं समोर येतंय. बंगळुरु पोलीस आयुक्तांनी या घटनेला दुजोरा दिलाय.
गौरी लंकेश या पत्रकार - लेखक पी लंकेश यांच्या कन्या होत्या. कर्नाटकातील अनेक प्रतिष्ठित वर्तमानपत्रांसाठी गौरी लंकेश यांनी अनेक लेख लिहिले होते. इंग्रजी आणि कन्नड भाषेत त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले होते.
गेल्या वर्षी, धारवाडचे भाजपचे खासदार प्रल्हाद जोशी यांच्याविरुद्ध एक बातमी छापल्यामुळे त्यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि १० हजारांची शिक्षा सुनावण्यात आली होती. कर्नाटक मॅजिस्ट्रेट कोर्टानं हा निर्णय दिला होता. याविरुद्ध वरच्या कोर्टात दाद मागणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
गौरी लंकेश यांनी नेहमीच कट्टर हिंदुत्ववादाचा विरोध केला होता. वैचारिक मतभेदाच्या कारणावरून त्या काही लोकांच्या निशाण्यावर असल्याचं सांगण्यात येतंय.