नवी दिल्ली: सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणात गुरुवारी न्यायालयाने काँग्रेस नेते शशी थरूर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र, त्याचवेळी न्यायालयाने थरूर यांच्या परदेशात जाण्यावर निर्बंध घातले. या पार्श्वभूमीवर भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी थरूर यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली. शशी थरूर यांच्या परदेश प्रवासावर बंदी आल्याने आता त्यांना भारतामध्येच राहावे लागेल. त्यामुळे त्यांना जगभरातील त्यांच्या गर्लफ्रेंडसना भेटता येणार नाही, असे स्वामी यांनी म्हटले. त्यामुळे या सगळ्याला आता थरुर कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर या १७ जानेवारी २०१४ रोजी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी मे महिन्यात थरूर यांच्यावर कलम ४९८ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे थरूर यांच्या अडचणी वाढल्या होत्या. थरूर यांनी यांनी त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात अनेक विसंगती असल्याचे म्हटले होते. विशेष शोध पथकाने आपल्या अहवालात या प्रकरणाचा तपास संपल्याचे म्हटले होते. तसेच थरूर यांना अटक करून कोणतीही चौकशी करण्याची गरज नसल्याचेही विशेष तपास पथकाने अहवालात नमूद केले होते. याचाच आधार घेत थरुर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर न्यायालयाने आज एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर थरूर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.
Yes, he can't go out of the country and see all his girlfriends in various parts of the world: Subramanian Swamy to ANI on a Delhi Court directing Shashi Tharoor not to travel abroad without prior permission of the court #SunandaPushkar pic.twitter.com/UY4dYEIggz
— ANI (@ANI) July 5, 2018