पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला, तर भाजप सोडू - शत्रुघ्न सिन्हा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या विरोधकांच्या महाआघाडीच्या जाहीर सभेला भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी उपस्थिती लावल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Updated: Jan 21, 2019, 05:49 PM IST
पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला, तर भाजप सोडू - शत्रुघ्न सिन्हा title=

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या विरोधकांच्या महाआघाडीच्या जाहीर सभेला भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी उपस्थिती लावल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशातच जर पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर आपण भाजपमधून बाहेर पडू, असे शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे. त्याचवेळी त्यांनी बिहारमधील उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सुशील मोदी यांच्यावरही टीका केली. 

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, कोण सुशील मोदी? भाजपमध्ये मी फक्त एकाच मोदींना ओळखतो. खरे ऍक्शन हिरो. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी. बाकी कोणत्याही मोदींना मी ओळखत नाही. मी काय करावे हे सांगण्याचे त्यांचे काम नाही. जर त्यांना प्रसिद्धीच हवी असेल, तर त्यांनी इतर मार्गांनी मिळवावी. माझे नाव वापरून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करू नये. जर प्रश्न फक्त भाजप सोडण्याचाच असेल, तर पक्षश्रेष्ठींनी मला तसा आदेश द्यावा, मी त्यावर निर्णय घेईन, असे सिन्हा यांनी म्हटले आहे. 

कोलकातामध्ये शनिवारी झालेल्या प्रचारसभेचा उद्देश हा केवळ लोकशाही वाचविण्याचा होता, असे म्हणत शत्रुघ्न सिन्हा यांनी रविवारी पुन्हा एक नवा वाद ओढवून घेतला. आधीच विरोधकांच्या जाहीर सभेला ते उपस्थित राहिल्यामुळे भाजपमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शत्रुघ्न सिन्हा हे पाटणासाहिब मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. या आधीही त्यांनी भाजपमधील नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या एकाधिकारशाहीला विरोध केला होता. या जाहीरसभेनंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी काही ट्विट करून ममता बॅनर्जी यांच्या कामाचे कौतुक केले. देशातील लोकशाही व्यवस्था वाचविण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी लाखोंहून अधिक नागरिकांना या सभेसाठी एकत्र आणले. त्यासाठी त्याचे अभिनंदन केले पाहिजे, अशा आशयाचे ट्विट शत्रुघ्न सिन्हा यांनी केले होते. या सभेला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी हे सुद्धा उपस्थित होते.