नवी दिल्ली: पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शुक्रवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. पुलवामातील अवंतीपूरा परिसरात गुरुवारी जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफच्या ताफ्यावर स्फोटके भरलेले वाहन घुसवून भीषण स्फोट घडवून आणला होता. या वाहनात तब्बल ३५० किलो आयईडी स्फोटके भरली होती. त्यामुळे या स्फोटाची तीव्रता प्रचंड होती. यामध्ये सीआरपीएफच्या एका बसचे अक्षरश: तुकडे झाले. या बसमधील ४४ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर स्फोटात जखमी झालेल्या उर्वरित जवानांवर अजूनही उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारने पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावावा, असे सांगितले. सरकारने आता निवडणुकांचा विचार बाजूला सारून पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. यासाठी सर्व देश त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा आहे. यापूर्वी भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा मला अभिमान आहे. परंतु, हा सर्जिकल स्ट्राईक पाकव्याप्त काश्मीर म्हणजे एकप्रकारे भारतीय भूमीतच झाला होता. मात्र, आता थेट पाकिस्तानमध्ये घुसावे लागेल, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
Sanjay Raut, Shiv Sena to ANI: Shiv Sena demands for a joint session of Parliament to hold discussions over yesterday's #PulwamaAttack. (file pic) pic.twitter.com/AviyoUFAaH
— ANI (@ANI) February 15, 2019
दरम्यान, आज सकाळीच दिल्लीत पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी राजनैतिक कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जाही भारताने रद्द केला आहे.