Aditya Thackeray in Ayodhya : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज बहुचर्चित अयोध्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांनी अयोध्येत रामलल्लांचं दर्शन घेतलं. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी शरयू तीरावर आरती केली. यावेळी त्यांच्याबरोबर संजय राऊत, चंद्रकांत खैरे, एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते सहभागी होते.
शरयू नदीच्या तीरावर एक वेगळाच आनंद मिळत असतो आणि त्याससाठी आपण इथे येतो अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शरयू नदीची महाआरती संपन्न झाली आहे. संपूर्ण वातावरण हे भक्तीमय आणि मंगलमय झालं आहे, रामभक्तमय झालेलं आहे, असं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
त्याआधी आज दुपारी अयोध्येत आदित्य ठाकरेंनी इस्कॉन मंदिरात दर्शन घेतलं. तिथे जेवणही केलं. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी हनुमान गढीवर जाऊन मारुतीचं दर्शन घेतलं. शिवसैनिकांकडून अयोध्येत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येतंय.
अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यात केलीय. अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांशी फोनवरुन बोलणार आहेत. अयोध्येत महाराष्ट्र सदनासाठी जागेबद्दल दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये बोलणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.