नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात हर घर तिरंगा मोहिम राबवण्यात येतायत. या मोहिमेला देशभरातील नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मोहिमे निमित्तचं घराच्या छतावर तिरंगा लावायला गेलेल्या एका देशवासियांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या घटनेने संपुर्ण गावावर शोककळा पसरलीय.
मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये एक किराणा दुकानातील कामगार तिरंगा लावण्यासाठी छतावर चढला होता. घराच्या छतावर तिरंगा लावत असताना लोखंडी पाईपचा विजेच्या तारेला स्पर्श झाला होता. त्यामुळे तिरंगा हातात घेतलेल्या कामगाराला विजेचा जोराचा झटका बसल्याची घटना घडली. या घटनेत कामगाराचा जागीच मृत्यू झाला. मोहन बाबू पटेल असे या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने गावावर दुखाचा डोंगर कोसळलाय.
खरगोन जिल्हा मुख्यालयापासून 80 किमी अंतरावर असलेल्या बरवाह येथील नर्मदा रोडवर मृत मोहन पटेल हा नर्मदा रोडवरील अशोक खंडेलवाल यांच्या किराणा दुकानात कामाला होता. किराणा दुकानात काम करणारा मोहन पटेल लोखंडी पाईपला ध्वज लावून तो छतावर चढला होता.या पाईपचा संपर्क विद्यूत तारेशी झाला आणि मोठा अपघात घडला. त्यामुळे त्याच्या शरीरातून धूर निघू लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन त्यांच्या किराणा दुकानात १५ वर्षांपासून काम करत होता. त्याला दोन मुले आहेत. दोघेही इंदूरमध्ये राहून शिक्षण घेत आहेत.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सध्या बारव्हा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.