नवी दिल्ली : श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबला आज साकेत न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ केली आहे. कोर्टाने दिल्ली पोलिसांना नार्को टेस्टला मान्यता दिली आहे. दिल्ली पोलीस आफताबला उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये देखील घेऊन जाणार आहे. दिल्लीत येण्याआधी श्रद्धा आणि आफताब या राज्यात गेले होते.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आफदाबला कोर्टासमोर सादर करण्यात आले. पोलिसांना अद्याप श्रद्धाचे डोके, मोबाईल फोन आणि हत्येत वापरलेले हत्यार सापडलेले नाही. पोलीस सातत्याने शोध घेत आहेत. आफताब सतत आपली वक्तव्ये बदलत आहे. आफताबने एकदा पोलिसांना सांगितले की, श्रद्धा तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणत होती, म्हणून त्याने तिची हत्या केली. तर कधी सांगतो की, मी फोनवर कोणासोबत बोलत असे तर श्रद्धा माझ्यावर संशय घ्यायची. म्हणून आमच्यात वाद झाला.
कोर्टाच्या बाहेर घोषणाबाजी सुरू होती. वकिलांनी आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केलीये. कोर्टात वकिलांनी 'श्रद्धाच्या मारेकऱ्याला फाशी द्या..' अशा घोषणा दिल्या.
केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, 'आम्ही देशात बलात्कार, लहान मुलांची हत्या आणि महिलांवरील गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयांची तरतूद केली आहे. आम्ही POCSO कायद्यांतर्गत जलदगती न्यायालये आणि जलदगती विशेष न्यायालयांसाठी रोडमॅप तयार केला आहे. गुन्हा कोणताही असो, गुन्हेगार कोणीही असो, कायद्यानुसार त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. न्यायालये मजबूत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.'
गुन्हेगार जर सत्य सांगत नसेल तर पोलिसांकडून नार्को टेस्टचा वापर केला जातो. एखाद्या व्यक्तीच्या मनातून सत्य काढण्यासाठी याचा वापर केला जातो. अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांना नार्को टेस्टमुळे मोठी मदत मिळाली आहे.
नार्को टेस्ट ही तशी सोपी प्रक्रिया आहे. गुन्हेगाराला सोडियम पेंटोथॉलचे इंजेक्शन दिले जाते. याला ट्रुथ ड्रग असेही म्हणतात. जेव्हा हे औषध शरीरात प्रवेश करते, तेव्हा व्यक्ती अशा अवस्थेत पोहोचतो. तो बेशुद्धावस्थेतही नसतो आणि पूर्ण शुद्धीतही नसतो. या दोघांमध्ये एक असा टप्पा असतो ज्यामध्ये व्यक्ती जास्त बोलू शकत नाही. पण तो खोटं बोलत नाही. त्यामुळे तपास पथकाला सत्यापर्यंत पोहोचण्यास मदत होते.
नार्को टेस्ट करताना व्यक्तीचा मृत्यू होण्याचाही धोका असतो. चाचणी दरम्यान सोडियम पेंटोथॉलची अचूक मात्रा द्यावी लागते. जर हे प्रमाण कमी जास्त झाले तर ती व्यक्ती कोमात देील जावू शकते.