काश्मीरमध्ये जुम्म्याच्या नमाजसाठी लष्कराने उचलले 'हे' पाऊल

आज लोक घरातून बाहेर पडल्यानंतर वातावरण सामान्य दिसले. 

Updated: Aug 9, 2019, 01:23 PM IST
काश्मीरमध्ये जुम्म्याच्या नमाजसाठी लष्कराने उचलले 'हे' पाऊल title=

श्रीनगर: जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर सध्या काश्मीर खोऱ्यात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सध्या खोऱ्यात मोठ्याप्रमाणावर लष्कर तैनात करण्यात आले होते. तसेच हिंसक निदर्शनांची शक्यता लक्षात घेऊन काश्मीर खोऱ्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. 

मात्र, आज जुम्म्याचा नमाज अदा करण्यासाठी खोऱ्यातील संचारबंदी काहीप्रमाणात शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवसांनंतर पहिल्यांदाच लोक घरातून बाहेर पडताना दिसले. तेव्हा गेल्या काही दिवसांपासून निर्मनुष्य असणाऱ्या रस्त्यांवर माणसांची लगबग पाहायला मिळाली. 

अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर दगडफेकीच्या तुरळक घटना वगळता काश्मीरमध्ये शांततेचे वातावरण आहे. मात्र, आज लोक घरातून बाहेर पडल्यानंतर वातावरण सामान्य दिसले. त्यामुळे काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होऊ शकते. 

मात्र, तुर्तास लष्कराकडून काश्मीर खोऱ्यातील संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि 'माकप'चे नेते सीताराम येचुरी यांनी काश्मीरमध्ये येण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना श्रीनगर विमानतळावरच रोखण्यात आले होते.