आता काँग्रेसची आर या पारची लढाई आहे - सोनिया गांधी

सध्या अंधेरी नगरी चौपट राजा असे झाले आहे. सरकारच्या कंपन्या कोणाला विकल्या जात आहेत? मागील दशकात एवढी बेरोजगारी नव्हती. आर या पार निर्णय घ्यावा लागेल, असा घणाघात  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केला आहे.

Updated: Dec 14, 2019, 04:30 PM IST
आता काँग्रेसची आर या पारची लढाई आहे - सोनिया गांधी title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : सध्या अंधेरी नगरी चौपट राजा असे झाले आहे. काँग्रेस मागे हटणार नाही. दररोज संविधान संपवले जात आहे. संविधान वाचविण्याचं काम करणार आहे. काळा पैसा कुठे गेला? याची चौकशी करायला पाहीजे. सरकारच्या कंपन्या कोणाला विकल्या जात आहेत? मागील दशकात एवढी बेरोजगारी नव्हती. आर या पार निर्णय घ्यावा लागेल. विना चर्चा कोणतेही विधेयक पारीत केले जातेय. चुकीच्या निर्णयाने उद्योग बुडाले आहे. तरूण नोकरीच्या शोधात आहेत. आपला देश असे भेदभाव होऊ देणार नाही. मोदी शाह यांचे लक्ष्य आहे लोकांमध्ये वाद लावून मुख्य मुद्दे लपवण्यावर भर देण्यात येत आहे, असा घणाघात करत आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी कोणतीही कुर्बानी देणार, असे सांगत मोदींची सबका साथ सबका विकासची घोषणा कुठे गेली असा सवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केला आहे.

सोनिया गांधी यांनी अर्थव्यवस्थेची परिस्थिती, बेरोजगारी, शेतकरी यासह विविध प्रश्नांवरुन सरकारवर हल्लाबोल केला. ‘कोणतीही व्यक्ती किंवा देश असो, आयुष्यात एक प्रसंग असा येतो की आरपारचा निर्णय घ्यावा लागतो. आज ती वेळ आली आहे. देश वाचवायचा असेल, तर आपल्याला कठोर संघर्ष करावाच लागेल. शेतकऱ्यांची आजची परिस्थिती पाहते तेव्हा मला अत्यंत वेदना होतात. त्यांचं जगणं आणखी कठीण झाले आहे. शेतात योग्य वेळेवर बी-बियाणे, खते, वीज, पाणी वेळेवर मिळत नाही. एवढ्या अडचणी असताना पिकाला योग्य दरही मिळत नाही. शेतकरी पूर्ण कुटुंबासोबत आत्महत्या करणाऱ्या बातम्या येत आहेत, आपल्याला या सर्वांसाठी संघर्ष करायचा आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्यात.

दिल्लीत काँग्रेसने भारत बचाओ रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी महागाई, मोदी सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. मात्र या रॅलीच्या निमित्ताने राहुल गांधी यांचे नेतृत्व पुन्हा एकदा पुढे येताना दिसत आ. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान व्हावं असाही एक सूर या आंदोलनातून उमटलेला दिसला. दिल्लीच्या रामलीला मैदानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर विविध मुद्यांवरून घणाघाती टीका केली. रेप इन इंडिया वक्तव्यावर बोलताना त्यांनी माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही. कुठलाही काँग्रेस कार्यकर्ता माफी मागणार नाही. उलट नरेंद्र मोदींना आणि त्यांचे असिस्टंट अमित शाह यांनाच देशाची माफी मागावी लागेल अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

मूठभर उद्योगपतींसाठी पंतप्रधान मोदींनी देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केली असा घणाघात त्यांनी यावेळी केला. देशाचा जीडीपी ९ टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आलाय. जीडीपी मोजण्याची पद्धतही मोदींनी बदलून टाकलीय. जुन्या पद्धतीनं जर जीडीपी मोजला तर देशाची अर्थव्यवस्था आज अडीच टक्केच राहिलीय. देशाच्या सर्व शत्रूंना वाटत होते की, भारताची अर्थव्यवस्था संपावी. त्यानुसार, आज आपली अर्थव्यवस्था संपलीय. मात्र हे काम त्यांनी केलेलं नाही तर आपल्याच पंतप्रधानांनी केलंय. तरीही ते स्वतःला देशभक्त म्हणवून घेतायत. अशा कडव्या शब्दांत राहुल गांधींनी मोदींवर टीका केली. तसंच मूठभर उद्योगपतींसाठी पंतप्रधान मोदींनी देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केली असा घणाघात त्यांनी यावेळी केला.

तर देशाची अवस्था बिकट बनलेली असतानाही सगळीकडे मोदी है तो मुमकीन है अशा जाहिराती झळकतायत. या जाहिराती फसव्या असून या उलट देशातली परिस्थिती बनलीय. अशा शब्दांत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.