जगातील आठ आश्चर्यांत 'स्टॅच्यु ऑफ युनिटी'चा समावेश

जगातील आठ श्रेष्ठ पर्यटनस्थळांमध्ये याचा समावेश झाल्यानं इथं पर्यटनालाही वाव मिळेल

Updated: Jan 15, 2020, 10:03 AM IST
जगातील आठ आश्चर्यांत 'स्टॅच्यु ऑफ युनिटी'चा समावेश title=

नर्मदा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला आणि नर्मदेच्या किनाऱ्यावर उभारण्यात आलेला 'स्टॅच्यु ऑफ युनिटी'  (Statue of Unity) पुतळ्याचा जगातील आठ आश्चर्यांत समावेश करण्यात आलाय. आठ देशांची आंतरराष्ट्रीय संघटना असलेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायजेशननं (SCO) 'स्टॅच्यु ऑफ युनिटी'चा जगातील आठ आश्चर्यांपैंकी एक घोषीत केलंय. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करून ही माहिती दिलीय. शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायजेशनच्या सदस्यांमध्ये भारत, पाकिस्तान, चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, तझाकिस्तान, रशिया आणि उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहेत.

गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडिया (kevadia) स्थित स्टॅच्यु ऑफ युनिटीला SCO च्या आठ आश्चर्यांत स्थान मिळणं ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जगातील आठ श्रेष्ठ पर्यटनस्थळांमध्ये याचा समावेश झाल्यानं इथं पर्यटनालाही वाव मिळेल. तसंच केवडियाच्या स्थानिकांनाही रोजगाराच्या अनेक संधी उत्पन्न होतील. SCO चे सदस्य देशही स्टॅच्यु ऑफ युनिटीचा प्रचार करतील.

मला हे सांगताना खूप आनंद होतोय की, अद्वितीय प्रतिमा असलेल्या 'स्टॅच्यु ऑफ युनिटी'ला SCO च्या आठ आश्चर्यात सामिल करण्यात आलंय. या सन्मानामुळे नक्कीच पर्यटक इकडे अधिक आकर्षित होतील, असं ट्विट परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केलंय.

शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायजेशन एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे ज्यामध्ये रशिया, चीनसहीत आठ सदस्य देशांचा समावेश आहे. आपल्या क्षेत्रात परस्पर विश्वास आणि संबंध मजबूत करणं तसंच शांती-सुरक्षा आणि स्थिरतेला प्रोत्साहन देणं हे आपलं लक्ष्य आहे, असंही एस. जयशंकर यांनी म्हटलंय.