नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं सुनावलेल्या निर्णयानंतर दिल्ली - एनसीआरमध्ये फटाके विक्रीसाठी बंदी घालण्यात आलीय. यानंतर फटाके विक्रेत्यांचे धाबे दणाणलेत.
कोर्टाच्या या निर्णयामुळे निराश झालेल्या एका फटाके विक्रेत्यानं बुधवारी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. यापूर्वी फटाके विक्रेत्यांनी बाजारात जोरदार आंदोलनही केलं.
सुप्रीम कोर्टाच्या फटाक्यांवरच्या बंदीच्या निर्णयानंतर सदर बाजार परिसरातील २४ फटाक्यांच्या दुकानांचं लायसन्स रद्द करण्यात आलं. उल्लेखनीय म्हणजे, काही दिवसांपूर्वीच या सर्व फटाके विक्रेत्यांना दुकान उघडण्यासाठी लायसन्स देण्यात आले होते.
बुधवारी सदर बाजारातील सर्व दुकानं बंद करण्यात आली होती. त्यामुळे विक्रेते आणि कर्मचारी निराश झाले होते. याच दरम्यान उपोषणावर बसलेल्लया हरजीत छाबडा या एका फटाके विक्रेत्यानं स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
लायसन्स मिळाल्यानंतर जो माल खरेदी केला होता त्याचं आता काय करायचं? असा प्रश्न या छोट्या विक्रेत्यांना पडलाय.