'आम्ही काय फक्त टाळ्या...,' शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितलं अयोध्या राम मंदिरात न जाण्याचं कारण, 'हा अहंकार...'

स्वामी निश्चलानंद महाराज यांनी चारही शंकराचार्य अयोध्येत राम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेला हजेरी का लावणार नाही हे स्पष्ट केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 15, 2024, 01:13 PM IST
'आम्ही काय फक्त टाळ्या...,' शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितलं अयोध्या राम मंदिरात न जाण्याचं कारण, 'हा अहंकार...' title=

एकीकडे अयोध्येत राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनेवरुन उत्साह असताना, दुसरीकडे शंकराचार्यांनी या कार्यक्रमाला विरोध केला असल्याने वाद निर्माण झाला आहे. अयोध्येत उभारल्या जात असलेल्या राम मंदिरात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनेला आपण हजर राहणार नसल्याचं शंकराचार्यांनी सांगितलं आहे. शंकराचार्यांना हिंदू धर्मात मानाचे स्थान असल्याने त्यांच्या विरोधाकडे गांभीर्याने पाहिलं जात आहेत. यादरम्यान पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी त्यांचा निर्णय रामलल्लाच्या मूर्तीच्या स्थापनेदरम्यान प्रस्थापित परंपरांपासून विचलनामध्ये असल्याचा खुलासा केला आहे. 

स्वामी निश्चलानंद महाराज यांनी एएनआयशी संवाद साधताना चारही शंकराचार्य राम मंदिराच्या कार्यक्रमाला उपस्थित का राहणार नाहीत याचं कारण सांगितलं आहे. "शंकराचार्य स्वतःची प्रतिष्ठा राखतात. हा अहंकाराचा प्रश्न नाही. पंतप्रधान जेव्हा रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतील तेव्हा आम्ही फक्त बाहेर बसून टाळ्या वाजवणं अपेक्षित आहे का? धर्मनिरपेक्ष सरकारची उपस्थिती म्हणजे परंपरा नष्ट झाल्या असं होत नाही," अशी टिप्पणी त्यांनी केली आहे. 

दरम्यान शंकराचार्य अनुपस्थित राहणार असल्याने विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका सुरु आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी मंदिर निर्माणधीन असल्या कारणाने शंकराचार्यांनी या कार्यक्रमाला हजर राहणं टाळलं असल्याचा आरोप केला आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मिळालेलं निमंत्रण नाकारताना काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी आमचे शंकराचार्यही राम मंदिराच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं विधान केलं आहे. 

"जेव्हा तुम्ही कार्यक्रमाला राजकीय रुप देता आणि तसे निर्णय घेता तेव्हा आपल्या सनातन धर्मातील सर्वोच्च असणारे शंकराचार्यही तिथे उपस्थित राहण्यास नकार देतात. सर्व शंकराचार्यांनी या कार्यक्रमावर आपण बहिष्कार टाकणार असल्याचं जाहीर केलं असून आता हा मोठा मुद्दा झाला आहे. जर शंकराचार्य असं म्हणत असतील तर त्याला एक वेगळं महत्त्वा आहे," असं अशोक गेहलोत म्हणाले.

दिल्लीचे मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी आरोप केला आहे की, भाजपा राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला राजकीय टॅग लावून देशातील दोन तृतीयांश लोकसंख्येला रामापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे. "प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी एक व्यवस्था असू, परंपरांचा संच आहे. जर ही घटना धार्मिक असेल तर ती चार पीठांच्या शंकराचार्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे का? चारही शंकराचार्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, अपूर्ण मंदिराची प्राणप्रतिष्ठा होऊ शकत नाही. जर हा कार्यक्रम धार्मिक नसेल, तर तो राजकीय आहे," असंही ते म्हणाले.

राम मंदिराच्या भव्य उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने 22 जानेवारीला राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना करण्याचा मुहूर्त म्हणून दुपारची वेळ निश्चित केली आहे. अयोध्येतील राम लल्लाच्या प्राण-प्रतिष्ठा सोहळ्यासाठी वैदिक विधी मुख्य सोहळ्याच्या एक आठवडा अगोदर 16 जानेवारीला सुरू होणार आहेत.