Swiggy Zomato वरुन जेवण मागवल्यास एक पदार्थ किती महाग? आकडा पाहून म्हणाल, ही खिसा रिकामा करायची कामं

Swiggy Zomato : बापरे... कळत नकळत हा खर्च तुमच्याही नजरेतून दुर्लक्षित राहतोय का? आकडेमोड पाहा आणि तुम्हीच ठरवा...   

सायली पाटील | Updated: Sep 24, 2024, 12:06 PM IST
Swiggy Zomato वरुन जेवण मागवल्यास एक पदार्थ किती महाग? आकडा पाहून म्हणाल, ही खिसा रिकामा करायची कामं title=
Swiggy Zomato online food order app and expensive rates know the reason behind it

Swiggy Zomato : घरच्या घरी किंवा अगदी कुठेही बसल्या जागी आवडीचा एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाली की अनेक मंडळींचे हात आपोआपच स्विगी, झोमॅटो या आणि अशा अॅपकडे वळतात. इथं एकाच ठिकाणी तुम्हाला हवा तो पदार्थ अगदी तुमच्या आवडीच्या हॉटेलमधून, इतकंच काय तर अगदी पंचतारांरित हॉटेलमध्ये असणाऱ्या एखाद्या आऊटलेटमधूनही मागवता येतो. पण, ही चमचमीत किंवा आवडीचं खाण्याची भूक भागवण्याच्या नादात तुम्हाला किती रकमेचा भूर्दंड पडतो माहितीय? 

लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे एखाद्या रेस्तराँमध्ये मिळणारं जेवण आणि ऑनलाईन अॅपवर मिळणारा तोच पदार्थ यांच्या दरात मोठी तफावत असते. अमुक एका रेस्तराँ किंवा तत्सम ठिकाणहून तुमच्या प्राधान्याचा पदार्थ अपेक्षित ठिकाणी अगदी थेट तुमच्यापर्यंत पोहोचतो पण, यादरम्यान तुम्हाला त्या पदार्थाहून जास्त अर्थात 20 ते 25 टक्के अधिक रक्कम भरावी लागते. 

cnbc नं काही उदाहरणांसह प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार एखाद्या नामांकित दुकानात लहानसा पिझ्झा 139 रुपयांना आहे. तर, स्विगीवर तो 169 रुपयांना दाखवण्यात आला. झोमॅटोबाबतही हीच परिस्थिती. साधारण 140 रुपयांचा आईस्क्रिम फालुदा अॅपवरून मागवल्यास त्याची किंमत वेळ पडल्यास थेट 200 ते 240 रुपयांपर्यंतही पोहोचते. 

हेसुद्धा वाचा : खरंच 'या' 9 पुस्तकांमध्ये दडलंय Mukesh Ambani यांच्या गडगंज श्रीमंतीचं गमक? 

 

का वाढते पदार्थांची किंमत? 

ठराविक अंतरावरून येणारं जेवण किंवा कोणताही खाद्यपदार्थ तयार केल्यापासून तो ग्राहकांपर्यंत पोहोचणार यादरम्यान अनेक टप्पे असतात. जिथं पदार्थांसाठी हँडलिंग चार्ज, कन्वेयन्स फी आणि डिलीव्हरी चार्ज अशी रक्कम आकारली जाते आणि परिणामी त्या पदार्थाचा दर वाढतो. अशा स्थितीमध्ये रेस्तराँ नजीक असल्यास थेट तिथं फोन करून पदार्थ मागवण्याचाही पर्याय असतो. कारण, इथं मेन्यूकार्डवर असणाराच दर आणि किरकोळ प्रवास भाडं ग्राहकांकडून आकारलं जातं. थोडक्यात अॅपवरून थोडं थोडं करून वारंवार जेवण आणि इतर काहीही खाद्यपदार्थ मागवल्यास त्या माध्यमातून तुमच्या खिशातूव तितकीच जास्त रक्कम वजा होत असते हे विसरून चालणार नाही.